जहाँगीर आर्ट गॅलरीत वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन
डॉ. रमाकांत पांडा यांचे तिसरे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : जागतिक कीर्तीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांचे ‘हार्टबीट्स’ वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन जहाँगीर आर्ट गॅलरीत २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पांडा यांचे हे मुंबईतील दुसरे, तर देशभरातील तिसरे प्रदर्शन आहे.
पद्मभूषण पुरस्कार विजेत्या या हृदयरोगतज्ज्ञाने आतापर्यंत ३० हजार हृदयरोग शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला आहे. एवढ्या व्यस्त दिनचर्येतून डॉ. पांडा यांनी फोटोग्राफीची आपली आवड जपली. यावेळचे प्रदर्शन हे दोन वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये भारत व जगभरातून काढलेले छायाचित्र, तर मुंबई व शहरात स्थलांतरित झालेल्या पक्ष्यांच्या २४० निवडक छायाचित्रांचा समावेश आहे. पांडा यांच्या प्रत्येक छायाचित्रामागे एक कहाणी दडली आहे.
डॉ. रमाकांत पांडा हे देशात सर्वाधिक मागणी असेलेले हृदयरोगतज्ज्ञ, लहानपणीपासून पांडा यांना वन्यजीव छायाचित्रणाची आवड होती. आपल्या आवडीनिवडी जपा. त्यामुळे तणाव कमी होतो. हृदय सृदृढ राहते, असे डॉ. पांडा यांचे सूत्र आहे. त्यामुळे आठवड्यात दोन विकेंडला ते थेट जंगलात जातात व तरोताजा होऊन येतात.
डॉ. पांडा यांनी वन्यजीव फोटोग्राफीसाठी अनेक अभारण्याला भेटी दिल्या. तिथल्या वन्यजीव, जंगलाची देखभाल वनमजुरांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या कर्मचारी, मजुरांच्या मदतीसाठी एशियन वाइल्ड लाइफ ट्रस्टची त्यांनी स्थापना केली. ‘हार्टबिट्स’ प्रदर्शनीतून छायाचित्र विक्रीतून आलेले सर्व उत्पन्न या ट्रस्टला दिले जाते.