विक्रोळीमध्ये पोलिस बंदोबस्तात पालिकेची इमारत रिकामी
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) ः विक्रोळी पार्कसाइट परिसरातील महापालिकेच्या तीन इमारतींना मंगळवारी कडक पोलिस बंदोबस्तात रिकामे करण्यात आले. सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने येथे नवीन टॉवर उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र या ठिकाणच्या काही रहिवाशांनी इमारत रिकामी करण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून ही कारवाई प्रलंबित होती.
मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत क्रमांक २२, २३ आणि २४ या इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया सुरू केली. कारवाईदरम्यान काही रहिवाशांनी तीव्र विरोध केल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या काळात पोलिस व रहिवाशांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले.
परिसरातील काही समाजसेवकांच्या पाठिंब्याने बाहेरून काही लोकांना आणून मनपाच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी आधीच खबरदारी घेत गर्दी हटवली. या इमारतींतील अनेक रहिवाशांनी आधीच जागा खाली केली होती; परंतु काही जण अद्याप जागा सोडण्यास इच्छुक नव्हते.
एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सांगितले की, या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना पीएपी योजनेअंतर्गत भांडुप येथील ओबेरॉय रिॲल्टीच्या टॉवरमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. रहिवाशांना याबाबत अनेकदा नोटीस देण्यात आली असून, टॉवरचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणीच त्यांना कायमस्वरूपी घरे देण्यात येणार आहेत.
रहिवासी तीर मोहम्मद म्हणाले, मी गेली चाळीस वर्षे येथे राहतो. जबरदस्ती आम्हाला खाली करण्यात येत आहे. सचिन बागुल यांनी सांगितले की, अनेक वर्षे आम्ही येथे राहतो. आम्हाला दूर पाठवले जात आहे.