मोखाड्यात ट्रकच्या अपघातात एक मजूर ठार
४०हून अधिक जखमी
मोखाडा, ता. २० (बातमीदार) ः मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगण घाटात ट्रक दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये जव्हार, मोखाड्यातील ४०हून अधिक मजूर प्रवास करीत होते. यात सुभाष दिवे (वय २८, मु. हाडे जव्हार) याचा जागीच मृत्यू झाला. तर ५०हून अधिक प्रवासी मजूर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जव्हार, मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिकला कामासाठी जातात. हे मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्याने कमी पैशांमध्ये प्रवास व्हावा, यासाठी मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा आधार घेतात. नाशिकवरून मोखाड्याकडे येणाऱ्या एका ट्रकमध्ये पन्नासहून अधिक मजूर बसले होते. मोखाड्याकडे येत असताना, तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना रात्री आठच्या दरम्यान घडली आहे. या सर्व जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील सुभाष दिवे याचा जागीच मृत्यू झाला आहे.