शिरवणेतील पदपथांवर कब्जा
वाहन दुरुस्तीच्या नावाखाली अतिक्रमण
नेरूळ, ता. २२ (बातमीदार) ः शिरवणे गावातील मुख्य रस्त्यांवर वाहन दुरुस्ती केली जात असल्याने पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. परिणामी, स्थानिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नवी मुंबई महापालिकेविरोधात संतापाचे वातावरण आहे.
शिरवणे गाव मुख्य प्रवेशद्वारातून गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांचे शोरूम आणि गॅरेज मालकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक वेळा पदपथावर वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. मार्ग अरुंद असल्याने सकाळी, सायंकाळी कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे शाळकरी मुलांबरोबर नोकरदार, गृहिणींना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.