एमआयडीसीच्या कोट्यवधींच्या भूखंडांवर भंगारमाफियांचे अतिक्रमण
वाशी, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील दिघा-महापे मार्गावर उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली असलेल्या एमआयडीसीच्या कोट्यवधी रुपयांच्या भूखंडांवर भंगार व्यावसायिकांनी मोठे अतिक्रमण करून ते भूखंड गिळंकृत केले आहेत. एमआयडीसीने यापूर्वी अनेकदा कारवाई करून अतिक्रमण हटवले असले तरी कारवाईनंतर भंगारविक्रेते पुन्हा त्याच ठिकाणी आपले बस्तान मांडतात. गवतेवाडी, चिंचपाडा, यादवनगर परिसरातील मुख्य रस्त्यालगत, जलवाहिनी आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालच्या भूखंडांवर हे अतिक्रमण झाले आहे.
मध्यंतरी गवतेवाडीत कारवाई करून एमआयडीसीने पत्रे लावून भूखंड संरक्षित केला होता, पण भूमाफियांनी ते कुंपण तोडून पुन्हा झोपड्या आणि भंगारची दुकाने थाटली.
भंगारविक्रेत्यांनी कारवाई टाळण्यासाठी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने ‘एकता नगर झोपडपट्टी गृहनिर्माण संस्था’ बनवून अतिक्रमण अधिकृत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या भंगार व्यवसायामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, रात्रीच्या वेळी या भागातून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका भंगार गोदामाला आग लागण्याचा प्रकारही घडला होता. एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधींचे भूखंड भंगारमाफियांनी ताब्यात घेतल्याचा हा गंभीर प्रकार आहे.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. पी. आव्हाड यांनी यासंदर्भात सांगितले, की भूखंडांवर अतिक्रमणाची पाहणी करून तातडीने कारवाई करण्यात येईल.