दिलीप पाटील : सकाळ वृत्तसेवा
वाडा, ता. २३ : नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत, मात्र खरी लढत ही तिरंगी होणार असल्याचे दिसून येते. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने कोण बाजी मारते, याकडे वाडावासीयांचे लक्ष लागले आहे.
वाडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निकिता गंधे, भाजपकडून रिमा गंधे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून हेमांगी पाटील, तर माकपकडून निकिता धानवा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र माकपवगळता तिघींमध्ये ही लढत चुरशीची होणार आहे. निकिता गंधे या शिवसेना सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे यांच्या पत्नी आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजप अशी थेट लढत होऊन भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या कन्या निशा सवरा या निवडणुकीत उभ्या होत्या.
वाडा शहरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पक्षाच्या फुटीनंतरही वाड्यातील पक्ष कायम आहे. काही अपवाद वगळता फारसा फरक पक्षाला पडला नसल्याचे दिसते. उद्धव ठाकरे गटाबरोबर काँग्रेस व बहुजन विकास आघाडी यांची आघाडी झाली आहे. मागील पाच वर्षांत शिवसेनेने केलेली भरीव विकासकामे यावर ठाकरे पक्ष मतदारांसमोर जात आहे.
माकपकडून निकिता धानवा या आपले नशीब आजमावित असून त्या किती मते आपल्या पारड्यात पाडतात की विजयापर्यंत जातात, हे येणाऱ्या काळात दिसून येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे या पदासाठी त्यांचे समर्थक मतदार आपली मते कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात टाकतात, यावर बरीचशी गणिते अंवलबून आहेत.
खासदारांचे शहर
भाजपलाही मानणारा वर्ग शहरात आहे. शहरात पक्षाची मजबूत पकड असून मागील निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. आता भाजप स्वबळावर निवडणूक लढवित आहे. खासदार डाॅ. हेमंत सवरा हे वाडा शहरातच राहत असून भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले यांच्याकडे निवडणुकीची सुत्रे दिली आहेत. राज्यात ‘लाडक्या बहिणी’प्रमाणे एखादी योजना आणून मतदारांची मते आपल्या पारड्यात पाडतात का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कुणबी मतदार पाठिशी
हेमांगी पाटील या शिवसेना नेते नीलेश सांबरे यांच्या बहीण आहेत. त्यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून कोकणात सामाजिक कार्य जोमाने सुरू आहे. वाड्यातही संघटनेला मानणारा वर्ग आहे. शिवाय या नगरपंचायतीत एकमेव कुणबी उमेदवार असून परिसरात कुणबी मतदार बहुसंख्येने आहेत. येथे जातीचे समीकरण यशस्वी झाल्यास त्या नक्कीच गुलाल उधळतील, यात तीळमात्र शंका नाही. तसेच एकनाथ शिंदेच्या माध्यमातून नगर विकास खात्यातून भरीव निधी गेल्या पाच वर्षांत शहरासाठी मिळाल्याने विविध समस्या मार्गी लागल्या असल्याचे शिंदे गटाचे नेते सांगत आहेत. या जोरावर शिंदे गट मतांची मागणी करताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.