भिवंडीमध्ये पासिंग सुविधा द्या
रिक्षाचालकांची सरकारकडे मागणी
भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : भिवंडीचा विकास होत असला तरी प्रवासी वाहतुकीची साधने कमी असल्याने अनेक प्रवाशांना रिक्षांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भिवंडी शहर आणि तालुक्यात रिक्षाची संख्या मोठी आहे. या रिक्षाच्या आणि मीटर पासिंगसाठी ३० किलोमीटर लांब आडवळणाच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे रिक्षासह सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सरकारने पासिंगची सुविधा भिवंडीत सुरू करावी, अशी मागणी रिक्षाचालकांच्या संघटनेने केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.
भिवंडी शहरालगत ग्रामीण भागातून समृद्धीसह अनेक मार्गांचे काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. अशा वेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्त्यालगत अथवा एखाद्या धाब्याशेजारी आपले बस्तान मांडून वाहनांवर नियंत्रण करताना दिसतात. अशा वेळी महामार्ग, राज्य मार्ग आणि शहरातील छोट्या-मोठ्या मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक सुविधांचे कार्यालय बनविणे ही काळाची गरज आहे. अशा कार्यालयाद्वारे भिवंडी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर वाहनांसाठीही येथे पासिंगची सोय केल्यास ठाणे, ऐरोली आणि विटावा येथे जाण्याचा त्रास कमी होऊन ठाण्यात जाणारी वाहने काही अंशी कमी करता येणे शक्य आहे, असे संघटनेने म्हटले आहे. भिवंडी येथील रिक्षाचालक आणि मालकांना पासिंगसाठी वाहतूक कोंडीचा सामना करीत ३० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि पैसा यांसह शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
पासिंगसाठी सेंटरमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव
भिवंडी आणि तालुक्यातील सर्व रिक्षाचालकांना रिक्षा व मीटर पासिंगसाठी ठाणे, विटावा आणि ऐरोली येथे जावे लागते. ऐरोलीमधील पासिंगची जागा आडबाजूला असून, तेथे मूलभूत सुविधा किंवा पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध नाही. आरटीओ अधिकाऱ्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळा निश्चित नसल्यामुळे रिक्षामालकांना सकाळी सात वाजता भिवंडीतून निघावे लागते आणि संपूर्ण दिवस वाट पाहात घालवावा लागतो. विशेषतः महिला परमिटधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
सरकारी जमिनीवर पासिंग सेंटर स्थापन करावे
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरटीओला त्यांच्या स्वतःच्या जागेवर काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. असे असूनही भिवंडीमध्ये आरटीओची स्वतंत्र कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. या समस्येबाबत भिवंडी ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अख्तर अली कादरी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, वाहतूक मंत्री आणि ठाणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले आहे. यामध्ये कादरी म्हणाले, की या समस्येचा परिणाम केवळ स्थानिक अर्थव्यवस्थेवरच होत नाही, तर शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरही होतो. केंद्रीय पातळीवर भिवंडी-निजामपूर क्षेत्रातील रिकाम्या सरकारी जमिनीवर आरटीओने पासिंग सेंटर स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.