भिवंडीत रिक्षाचालकाचा मुलगा झाला सनदी लेखापाल
भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर यश अशक्य नसते याचे जिवंत उदाहरण भिवंडी शहरात पाहायला मिळाले आहे. गेली ३५ वर्षे भाड्याच्या छोट्याशा खोलीत राहून रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकाचा मुलगा नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सनदी लेखापाल (सीए) झाला आहे. या गौरवास्पद यशामुळे केवळ केशरवाणी कुटुंबातच नव्हे, तर परिसरातील रिक्षाचालकांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यश गणेशलाल केशरवाणी (वय २२) असे सीए झालेल्या युवकाचे नाव आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या जोरावर हे यश प्राप्त केले. आई-वडील तसेच बहिणींच्या मोलाच्या सहकार्यामुळे आपली स्वप्ने पूर्ण करू शकल्याचे यशने सांगितले. यशचे वडील गणेशलाल माणिकचंद केशरवाणी हे मूळ प्रतापगढ-कुंढा (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून, ते १९८७ पासून भिवंडीत स्थायिक झाले आहेत. आजही ते भाड्याच्या घरात राहून प्रामाणिकपणे रिक्षाचालकाचा व्यवसाय करीत आहेत. आपल्या कष्टातून त्यांनी मुलगा आणि दोन मुलींचे संगोपन केले. यशने प्राथमिक शिक्षण प. रा. विद्यालयातून मराठी माध्यमात पूर्ण केले. पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण भिवंडीतील स्वयंसिद्धी मित्र संघ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर सीए परीक्षेची तयारी करून त्यात यश मिळवले. आपल्या मुलाच्या यशाबद्दल बोलताना गणेशलाल केशरवाणी म्हणाले, की आम्ही रात्रंदिवस रिक्षा चालवून मेहनत करीत राहिलो. आमची इच्छा एकच होती, की मुलांनी शिक्षण घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे. यश सीए झाला, मुलीही पदवीधर झाल्या यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी नाही. या यशोगाथेमुळे अनेक तरुणांना संघर्षातून यशाकडे वाटचाल करण्याची नवी प्रेरणा मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.