ठाणे एसटी आगारातील प्रवाशांना दिलासा
अखेर दुरुस्तीच्या कामास सुरुवात; सकाळच्या बातमीचा परिणाम
ठाणे शहर, ता. २२ (बातमीदार) : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या एसटी आगाराच्या दुरुस्तीच्या कामास अखेर सुरुवात झाल्याने एसटी प्रवासी आणि कर्मचारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या आगाराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची भीती प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून बसली होती. अखेर या गंभीर विषयाची दखल घेत प्रशासनाने दुरुस्तीच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे.
ठाणे रेल्वे स्थानक (पश्चिम) येथील हे एसटी आगार गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहे. येथून दररोज हजारो प्रवासी भिवंडी, पालघर, भाईंदर, वाडा, जव्हार, तलासरी तसेच इतर ग्रामीण आणि शहरी भागात प्रवास करतात. मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सुमारे १८ ते १९ हजार प्रवासी या आगारातून प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी आगाराची दुमजली इमारत उभारण्यात आली होती. मात्र दीर्घकाळ देखभाल व दुरुस्ती अभावी ही इमारत आता अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली होती. इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या, पिलर कमकुवत झाले होते, तसेच स्लॅबमधून पाण्याची सतत गळती सुरू होती. कार्यालयात काम करत असताना अनेक वेळा स्लॅबचे प्लास्टर खाली पडण्याच्या घटना घडत होत्या. अशा परिस्थितीत प्रवासी, कर्मचारी व अधिकारी अक्षरशः जीव मुठीत धरून काम करत होते. या धोकादायक परिस्थितीची दखल घेत सकाळ समूहाने या आगाराची वस्तुस्थिती बातम्यांमधून सातत्याने समोर आणली. प्रवासी व कर्मचाऱ्यांची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली. त्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले असून आगाराच्या संरचनात्मक दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
....................
सध्या दुमजली इमारतीवरील भार कमी करण्यासाठी वरचा एक मजला काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संपूर्ण कार्यालय क्षेत्राचे नवे प्लास्टरिंग करून संरचना मजबूत केली जाणार आहे. काही भागात लोखंडी सपोर्ट बसविण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या दुरुस्तीमुळे भविष्यात संभाव्य दुर्घटना टळणार असल्याने प्रवासी आणि कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक आणि एसटी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.