ठाण्याची धूळधाण
ठाणेकरांचा श्वास कोंडू लागला; मुख्य मार्गांसह अंतर्गत रस्तेही धुळीने माखले
ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) : दिल्लीने प्रदूषणात उच्चांक गाठला आहे. मुंबईतील हवा चिंताजनक आहे. ठाण्यावरही प्रदूषणाच्या संकटाचे ढग जमा झाले आहेत. शहरातून जाणारे मुख्य महामार्ग, अंतर्गत रस्ते आणि गल्लीबोळेही धुळींनी माखली आहेत. हवेत पसरलेल्या धूलिकणांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले असून, प्रशासनाकडून रस्ते धुण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्ते रुंदीकरण, विविध विकासकामे आणि इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याने संपूर्ण शहर धुळीच्या सावटाखाली सापडले आहे.
यंदाचा पाऊस उशिरापर्यंत पडत राहिल्यामुळे पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली विविध कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. घोडबंदर मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. रस्त्याच्या बाजूला डक्ट लाईनसाठी खोदकाम केले जात आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मेट्रोचे काम सुरू आहे. ठाणे-बोरिवली बोगदा तयार केला जात आहे. गायमुख घाट खड्ड्यात गेला आहे. यासोबतच ठाण्यातील विविध भागांत मोठमोठ्या रहिवासी इमारती बांधल्या जात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरात धुळीचे लोट पसरत आहेत. जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीने सर्वत्र धूळ पसरत आहे. दुचाकीचालक, रिक्षा प्रवाशांना धुळीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.
धुळीचे दुहेरी प्रदूषण
माती वाहून नेणाऱ्या डम्पर आणि ट्रकचे टायर धुवून स्वच्छ करण्याचा नियम असतानाही मातीने माखलेल्या अवस्थेतच त्यांची सर्रास वाहतूक होत आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणचा कचरा आणि वाळलेले गवत तिथेच जाळून नष्ट केले जात आहे, ज्यामुळे हवेत धूर पसरून हवा दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
प्रदूषण नियंत्रण नियमांना बगल
बांधकाम व्यावसायिकांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. बांधकामाच्या ठिकाणी धूळ उडू नये म्हणून भोवताली नेट बांधणे, परिसरात पाणी मारणे आणि रस्ते धुवून काढणे या नियमांना बगल दिली जात. धूळ उडण्याच्या ठिकाणी पाणी फवारणी यंत्र बसवणे आवश्यक आहे; मात्र तसे होत नसल्याचे चित्र आहे.
तोकडी धूळ नियंत्रण यंत्रणा
ठाणे शहरातील सर्वच प्रमुख चौकांत धूळ पसरू लागल्याने सर्वत्र धूळ नियंत्रण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. सध्या केवळ माजिवडा चौकातच असे यंत्र बसविण्यात आले आहे. वाहनांच्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण पाहता, ही यंत्रणा फारच तोकडी ठरत आहे.
ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक
ठाणे शहरातील हवेतील धुळीचे प्रमाण
तारीख हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक
१८ नोव्हेंबर १२६
१९ नोव्हेंबर १२०
२० नोव्हेंबर १२६
२१ नोव्हेंबर १३४
२२ नोव्हेंबर १४२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.