चव्हाण यांच्या पाठी इच्छुकांची लगबग
कल्याण-डोंबिवलीत भाजप उमेदवारांची चढाओढ
शर्मिला वाळुंज ः सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच भारतीय जनता पक्षात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मागील काही आठवड्यांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात आपले दौरे, प्रभागभेटी आणि समाज संवादाची मालिका मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. शनिवार-रविवारी पक्ष कार्यालय उद्घाटन, विविध कार्यक्रम, संमेलने, सोसायटी-संस्थांच्या बैठका अशा विविध कार्यक्रमांना चव्हाण सातत्याने हजेरी लावत आहेत; मात्र या प्रत्येक ठिकाणी आता चव्हाण यांच्या पाठीमागे इच्छुकांची वाढलेली लगबग असे लक्षवेधी चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
जिथे चव्हाण, तिथे आम्ही, असा जणू नियमच पाळत अनेक माजी नगरसेवक आणि नव्या इच्छुकांची मोठी गर्दी या कार्यक्रमांत दिसू लागली आहे. नेहमी शांत राहणारे किंवा नेतृत्वापासून अंतर ठेवणारे काहीजण आता चव्हाण ज्या ठिकाणी जातील, तिथे आपली उपस्थिती अनिवार्य ठरवत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तिकिटासाठी तीव्र स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता वाढली असताना, चव्हाण यांच्या नजरेत भरण्यासाठी सुरू झालेली ही धडपड राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
कल्याण-डोंबिवली भाजपमध्ये अलीकडेच झालेल्या मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रवेशानंतर जुन्या कार्यकर्त्यांमध्येही हालचाली जाणवत असून, प्रत्येक कार्यक्रमात ‘उपस्थिती दाखवा’ची चढाओढ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी आयोजकांपेक्षा इच्छुकांची गर्दीच अधिक दिसत आहे. मंचावरील मान्यवरांपेक्षा त्यांच्या मागे उभी असलेली उमेदवारांची रांगही ठळकपणे लक्ष वेधून घेत आहे.
संघटनात्मक बैठका
महापालिकेवरील सत्ता परत मिळवण्याच्या निर्धाराने भाजप सज्ज होत असून, याचा थेट परिणाम इच्छुकांच्या हालचालींवर दिसत आहे. प्रभागनिहाय संपर्क, संघटनात्मक बैठकांपासून लहान कार्यक्रमांपर्यंत राजकीय सक्रियता दाखवण्याची स्पर्धा तीव्र झाली आहे.
दौऱ्यांमुळे शहरात उत्साह
चव्हाण यांच्या दौऱ्यांमुळे शहरात उत्साह वाढला असला तरी इच्छुकांच्या या धडपडीबाबत नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीच्या काळापुरती ही धावपळ न ठेवता, प्रत्यक्ष नागरिकांच्या कामातही उमेदवारांनी तितक्याच तत्परतेने सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.