आधारवडाचा विश्वासघात
माणुसकीला कलंक आणि पोलिसांचा ‘पाठलाग’
पंकज रोडेकर (पाठलाग)
नात्यांचे आणि माणुसकीचे सारे बंध झुगारून एका कृतघ्न कृत्यात एका आधारवडाचा शेवट झाला. जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन ज्या राजेश नावाच्या व्यक्तीने पहिल्या नवऱ्यापासून विभक्त झालेल्या एका महिलेला आणि तिच्या दोन लहान मुलांना आपलेसे केले, तोच आधारवड त्यांच्या जीवनात असह्य झाल्यावर त्याच मायलेकरांनी त्याला जीवनातून सहज बाजूला केले. ठाणे ग्रामीण पोलिसांसमोर आव्हान होते. एक अनोळखी मृतदेह आणि शून्य धागादोरा; पण त्यांनी केवळ ओळखच नाही तर या माणुसकीला कलंक लावणाऱ्या मारेकऱ्यांना अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या.
महामार्गावरील गूढ आणि ओळख पटवण्याचे आव्हान
६ ऑक्टोबर २०२५ रोजी टोकावडे पोलिस ठाण्याचा फोन खणखणला. मुरबाड-उदालडोह गावाजवळून जाणाऱ्या अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पंचनामा आणि शवविच्छेदन अहवालानंतर धक्कादायक सत्य समोर आले. त्या व्यक्तीचा मृत्यू अपघात किंवा नैसर्गिक व्याधीने नव्हे, तर गळा आवळून खून केल्याने झाला होता.
आता पोलिसांची खरी कसोटी सुरू झाली. मृतदेहाची ओळख पटवणे आणि मारेकऱ्यांचा मागोवा घेणे हे दुहेरी आव्हान ठाणे ग्रामीण पोलिसांसमोर उभे राहिले. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तत्काळ टोकावडे पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले.
तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांना कुणकुण
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथके तयार केली.
आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेजची डोळ्यात तेल घालून तपासणी करण्यात आली. राज्यभरात दाखल असलेल्या हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारी तपासण्यात आल्या. तसेच संशयित वाहनांची कसून तपासणी केली.
दिवस पुढे सरकत होते, पण मृतदेहाची कोणतीही मिसिंग तक्रार नोंद नसल्यामुळे पोलिसांना तपास करणे कठीण झाले होते. कोणताही ठोस धागादोरा हाती नसताना पोलिस उपनिरीक्षक महेश कदम आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. याच विश्लेषणातून पोलिसांना एक महत्त्वपूर्ण कुणकुण लागली, की मयत वृद्ध व्यक्ती कल्याण शहरातील काटेमानिवली येथे राहत होती. पोलिसांनी आपला मोर्चा कल्याणकडे वळवला. मृतदेहाची ओळख पटताच पोलिसांना आणखी एक धक्का बसला. हा गुन्हा केवळ खुनाचा नसून, त्यात जवळच्या नात्यातील व्यक्तींचाच हात असल्याची शक्यता बळावली.
पोलिसांनी मृत वृद्धाच्या मोठ्या सावत्र मुलाला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांची खाकी वर्दी समोर येताच तो सावत्र मुलगा अगदी पोपटासारखा बोलू लागला. खुनाच्या घटनेचा तपशील, मदत करणारे साथीदार आणि हा टोकाचा निर्णय घेण्यामागचे कारण याचा अक्षरशः पाढाच त्याने वाचला. या कबुलीनंतर मृत राजेश यांची पत्नी (जी पहिल्या नवऱ्यापासून विभक्त झाली होती) आणि तिचे दोन्ही मुलगे (सावत्र मुलगे) हेच मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले. असह्य त्रास होत असल्याने त्यांनी आधारवड बनलेल्या राजेश यांना आपल्या जीवनातून बाजूला केल्याचे उघड झाले.
विश्वासावर प्रश्नचिन्ह
ग्रामीण पोलिसांनी केवळ ४८-७२ तासांच्या आत अत्यंत गुंतागुंतीचा आणि भावनिक गुंता असलेला हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी दिवस-रात्र एक केली. पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत केवळ ओळखच नव्हे, तर मारेकऱ्यांचा मागोवा घेऊन त्यांना अटक केली. सद्य:स्थितीत ते तिघे मायलेक जेलची हवा खात आहेत. या घटनेने समाजात एकच प्रश्न उभा राहिला आहे, की या दुनियेत कोणावर विश्वास ठेवायचा?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.