उल्हासनगरात ‘रग्बी’चा धूमधडाका
खेळाडूंचा शिस्त, क्रीडाभाव आणि तंत्राचा उत्कृष्ट संगम
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : उल्हासनगर शहराच्या क्रीडा इतिहासात प्रथमच अत्यंत भव्य आणि रंगतदार ठरलेली राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धा २०२५-२६ उत्साही वातावरणात पार पडली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांतील १६ संघांनी शिस्त, क्रीडाभाव आणि तंत्राचा उत्कृष्ट संगम दाखवत सेंच्युरी रेयॉन हायस्कूलचे मैदान युवा खेळाडूंच्या जोशाने अक्षरशः दणाणून सोडले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन उल्हासनगर महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त स्नेहा कर्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड आणि भारताचे आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू सचिन म्हसकर यांच्या हस्ते झाले. या वेळी सेंच्युरी रेयॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद भांडारकर, बी. के. बिर्ला शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. नरेशचंद्र, सेंच्युरी रेयॉन शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना भदाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांमधील मुलामुलींचे एकूण १६ संघ सहभागी झाले होते. मुलींच्या गटात लातूर विभागाने विजेतेपद पटकावून आपली क्रीडा कौशल्याची चमक दाखवली. नागपूर विभागाने द्वितीय आणि छत्रपती संभाजीनगर विभागाने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने प्रथम क्रमांक मिळवत शानदार कामगिरी केली; तर लातूर आणि मुंबई विभागांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाले.
तीन दिवस चाललेली ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ आणि सेंच्युरी रेयॉन हायस्कूलचे मोलाचे सहकार्य या यशस्वी आयोजनामागे होते. राज्यभरातील तरुण रग्बीपटूंना प्रेरणा देणारे हे क्रीडा पर्व उल्हासनगर शहरासाठी एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण ठरला.
खेळाडूंचा सन्मान
या स्पर्धेची सर्वात आकर्षक बाजू ठरली ती म्हणजे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची नावीन्यपूर्ण संकल्पना. त्यांच्या पुढाकाराने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना उत्कृष्ट प्रतीचे ट्रॅकसूट देण्यात आले. तसेच विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, मेडल यांसोबतच खास स्मार्ट वॉच देऊन सन्मानित करण्यात आले. या दर्जेदार पुरस्कारांमुळे युवा रग्बीपटूंचा चेहरा आनंद आणि अभिमानाने अधिकच उजळून निघाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.