श्रीकृष्ण मंदिर तलावात अवतरली विदेशी पाहुणी
ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) : हिवाळ्याच्या आगमनासोबतच बोइसरमध्ये एक दुर्मीळ परदेशी पाहुणी आली आहे. श्रीकृष्ण मंदिर तलावातील पाण्यात ती स्वच्छंदपणे विहार करताना दिसली आहे. काळ्या मानेची टिबुकली आकर्षक व दुर्मिळ दिसत असल्याने परिसरातील पक्षीनिरीक्षक आणि लोकांची तिला पाहण्यासाठी गर्दी होत असून, त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. ही टिबुकली साधारणपणे युरोप, आशिया, पूर्व व दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि दक्षिण/पश्चिम अमेरिका या भागांत वास्तव्य करते. लांब पल्ल्याच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेला हा जलपक्षी हिवाळ्यात उत्तर भारत, पाकिस्तान, मध्य अमेरिका आणि आफ्रिका येथे दाखल होतो. या विस्तीर्ण भौगोलिक उपस्थितीमुळे हा पक्षी स्थलांतरशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
युरोप, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये जून ते जुलै या कालावधीत या पक्ष्याची वीण होते. पाण्यावर तरंगणारे, गवताचे कपासारखे घरटे हा पक्षी कुशलतेने बांधतो. त्यात साधारण तीन ते चार अंडी घातली जातात आणि सुमारे २१ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. जन्मानंतर अवघ्या १० दिवसांत पिल्ले तलावभर सहज पोहू लागतात. नर आणि मादी हे दोघेही पिल्लांची जबाबदारी समान रीतीने वाटून घेतात, हा या प्रजातीचा विशेष गुणधर्म असल्याची माहिती पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांनी दिली. काळ्या मानेची टिबुकली हा पक्षी आकाराने टिबुकली लिटिल ग्रॅबपेक्षा थोडा मोठा असतो.
या पक्ष्याचा रंग काळा–पांढरा, मान पूर्ण काळी, पोट पांढरे, पंखांवर ठिपक्यांची छटा आणि सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे भडक लाल डोळे. चोच किंचित वर वळलेली असते. विणीच्या हंगामात डोके व मानेचा रंग अधिक गडद काळसर तपकिरी होत असल्याने याचे सौंदर्य आणखी खुलते.
पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
गवताने व्यापलेल्या शांत तलावांत राहणे हा या पक्ष्याचा अत्यंत आवडता स्वभाव. पाण्यात सतत डुबक्या मारत लहान मासे, शंख–शिंपले, बेडूक, किडे–किटक याचे तो भक्षण करतो. तलावाच्या पृष्ठभागावर त्याचे वेगवान पोहणे आणि अचानक मारलेल्या सलग डुबक्यांची मालिका पाहणे ही निसर्गप्रेमींसाठी एक वेगळीच मेजवानी ठरते. या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन घेताना बोइसरमध्ये सध्या पक्षिमित्र भेट देत आहे. दिवसभर कॅमेरे व दुर्बिणी घेऊन फोटोग्राफर्स तलावाच्या काठावर तळ ठोकून बसलेले दिसत आहेत. स्थानिक पर्यावरणासाठी हा एक महत्त्वाचा संकेत मानला जात असून, बोइसरच्या जैवविविधतेचा दर्जा किती उंचावला आहे याचे हे प्रतीक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
विशेष म्हणजे या पक्ष्याचे महाराष्ट्रात दर्शन यापूर्वी २०१६–१७ मध्ये मुंबईतील भांडुप मिठागरात झाले होते. जवळपास आठ वर्षांनंतर तो पुन्हा राज्यात दिसल्याने यंदाच्या हिवाळ्यातील पक्षी उद्देशीय नोंदींमध्ये या नोंदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
- वीरेंद्र घरत, पक्षी अभ्यासक, ठाणे
• लांबी : २५ - २८ सें.मी.
• वजन : २५० - ४५० ग्रॅम
• पंखांची लांबी : ५० - ६० सें.मी.
• उड्डाण क्षमता : तब्बल ३,००० किमीपर्यंतचे अंतर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.