शिंदे गटाच्या हालचालींना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
म्हसळ्यात मुस्लिम मतदारांशी थेट संवाद
श्रीवर्धन, ता. २५ (बातमीदार) : म्हसळा नगरपंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी (ता. २२) मुस्लिम मतदार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्षाची ताकद पुन्हा मजबूत करण्याचे संकेत दिले. बोर्लीपंचतन येथील ज्येष्ठ नेते महमद मेमन यांच्या निवासस्थानी झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. विशेषतः पालकमंत्रीपदावरून तटकरे व गोगावले गटात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भरत गोगावले यांनी अलीकडेच तटकरे गटावर टीकास्त्र सोडत भाजपसोबत स्थानिक पातळीवर युतीची शक्यता व्यक्त केली होती. याला अप्रत्यक्षपणे उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसने आता स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळ वाढवण्यावर भर दिला आहे. शिंदे गटाकडून नगरपंचायतीतील सत्ता मजबूत करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असताना, राष्ट्रवादीने आपल्या पारंपरिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. या बैठकीत बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यांनी पक्ष संघटन मजबूत ठेवण्यावर आणि सर्वसमावेशक राजकारणावर भर दिल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. ही बैठक म्हणजेच राष्ट्रवादीची “मनधरणी मोहीम” असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या कार्यक्रमास मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सय्यद कादरी, शहराध्यक्ष रियाज घरडे, अझहर हळदे, शाहिद उकये, फारूक पेणकर, मुश्ताक हुरझूक यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपंचायत निवडणुकीपूर्वी घडत असलेल्या या घडामोडींमुळे येत्या काळात म्हसळा परिसरात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.