बदलापूरमध्ये तुफान राजकीय धुमश्चक्री
कात्रप-शिरगाव रोडवर राडा
बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : कात्रप-शिरगाव रोड परिसरात भाजपच्या प्रचार सभेदरम्यान झालेल्या अनपेक्षित गोंधळामुळे बदलापूरचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप उमेदवार वैशाली साखरे आणि प्रदीप गीते यांच्या प्रचार सभेदरम्यान बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाच्या (बीएमपी) कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास भाजपची सभा सुरू असताना बहुजन मुक्ती पार्टीची (बीएमपी) रॅली त्याच ठिकाणी पोहोचली. रॅलीतील कार्यकर्त्यांनी जवळपास अर्धा तास फटाके फोडल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सभेचा कार्यक्रम सुरू असल्याने रॅली आटोपती घेण्यास सांगितल्यानंतर या छोट्याशा वादातून मोठा संघर्ष उभा राहिला आणि दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.
या प्रकारानंतर बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते तातडीने पोलिस ठाण्यात पोहोचले आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बीएमपीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नीलेश येलवे यांनी भाजपचे पदाधिकारी संजय राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. रॅलीतील कार्यकर्त्यांना मारहाण करणे, जातीवाचक उल्लेख करणे, महिलांच्या विनयभंगाचा प्रयत्न करणे असे आरोप केले. याबाबत पोलिसांनी संबंधितांना जबाबासाठी बोलावले असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली आहे.
भाजपचा ‘राजकीय स्टंट’चा प्रतिआरोप
दुसरीकडे भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी बीएमपीचे सर्व आरोप फेटाळून लावले. रॅलीला दिलेली वेळ संपल्यानंतरही बीएमपीकडून मुद्दाम सभा सुरू असताना फटाके फोडून वातावरण बिघडवण्याचा ‘राजकीय स्टंट’ करण्यात आल्याचा आरोप घोरपडे यांनी केला. उमेदवार वैशाली साखरे या स्वतः बहुजन समाजातील असल्याने जातीय उल्लेख केल्याचा आरोप सरळ सरळ खोटा असल्याचे घोरपडे यांनी स्पष्ट केले. घटनेच्या वेळी पोलिस उपस्थित असतानाही अचानक बीएमपी कार्यकर्त्यांनीच हाणामारीला सुरुवात केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.