जलतरण स्पर्धेसाठी आर्यनची निवड
उरण, ता. २५ (वार्ताहर) ः तालुक्यातील आर्यन मोडखरकरने विद्यापाठ स्तरावरील निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. उरण तालुक्यातून आंतरशालेय तसेच विद्यापीठ पातळीवर निवड होणारा आर्यन एकमेव जलतरणपटू ठरला आहे.
समुद्राने वेढलेल्या उरण तालुक्यात पोहण्याला विशेष महत्त्व आहे. आर्यनने उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावात अभ्यासाला सुरुवात केली. त्याची क्षमता, जिद्द ओळखून प्रशिक्षक हितेश भोईर यांच्या तालमीत विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवले होते. १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान डोंबिवलीतील पलावा सिटी जलतरण तलाव येथे झालेल्या निवड चाचणीत त्याने राष्ट्रीय स्पर्धेतील स्थान पक्के केले. आता चेन्नई येथील डॉ. टी. आर. परिवेंद्र अक्वाटिक कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
--------------------------
राज्याचे नेतृत्व
महाराष्ट्रातून निवडलेल्या १० मुली आणि १० मुलांच्या संघात आर्यनची निवड झाली असून, ५० मीटर बॅकस्ट्रोक, ५० मीटर बटरफ्लाय या जलतरण प्रकारात राज्याचे नेतृत्व करणार आहे. उरण तालुक्यातून दुहेरी पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेत झेप घेणारा खेळाडू ठरला आहे.