खोपोली नगरपरिषद निवडणुकीत राजकीय कल्लोळ
कार्यकर्ते, मतदार संभ्रमात; पडद्यामागे हालचाली वेगात
खालापूर, ता. २५ (बातमीदार) : खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या “डोळ्यात अंजन घालणारी” ठरत असल्याचे चित्र आहे. सोन्याच्या वाढत्या भावाप्रमाणेच सध्या पक्षातील कार्यकर्त्यांचा “भाव” वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे. कालपर्यंत ज्या पक्षावर कट्टर टीका केली, त्याच पक्षाची टोपी डोक्यावर, गळ्यात उपरणे आणि हातात झेंडा घेण्याची वेळ अनेक कार्यकर्त्यांवर आली आहे. त्यामुळे निष्ठा, भूमिका आणि राजकीय बांधिलकी यांचा गोंधळ उडाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
राज्य सरकारमध्ये एकत्र सत्तेत असलेले पक्ष, खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मात्र एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. सोशल मीडियावरून टीका-प्रत्युत्तर, आरोप-प्रत्यारोप आणि विखारी प्रचार जोरात सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात केलेली जहरी टीका विसरून आता “एकदिलाने” घोषणा देण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. नव्या आघाड्या, युती आणि आघाडीधर्म यामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत.
खोपोलीत परिवर्तन आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी एकत्र येत उमेदवारी अर्ज भरले. संयुक्त शक्तिप्रदर्शन, एकत्रित छायाचित्रे आणि पत्रकांची तयारीही झाली. मात्र मतदानाच्या आधीच या आघाडीत बिघाडी झाली. मित्र पक्षावर नाराजी व्यक्त करत उबाठा सेनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आक्रमकता वाढली. मात्र अवघ्या चोवीस तासांत पुन्हा तडजोड होत, नाराजी दूर झाल्याचे सांगत उबाठा सेना परिवर्तन आघाडीत पुन्हा सहभागी झाली. या सतत बदलणाऱ्या भूमिकांचा थेट परिणाम कार्यकर्त्यांवर झाला असून, मतदारही संभ्रमात सापडल्याचे दिसून येत आहे. लग्नाआधीच घटस्फोट होण्यासारखी अवस्था, रुसवे-फुगवे आणि ऐनवेळी बदलणारी मैत्री-शत्रुत्वाची गणिते यामुळे सामान्य मतदार कोणावर विश्वास ठेवावा, या विचारात पडला आहे.
....................
खोपोली नगरपरिषद निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत प्रत्येक वेळी खोपोलीचा कल अखेरच्या क्षणीच ठरलेला इतिहास आहे. तसेच, शहरातील एक प्रभावशाली राजकीय गट अद्यापही आपली ताकद टिकवून असून, थेट नगराध्यक्षपदावर कोण विराजमान होणार याची सूत्रे त्यांच्या हातात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पडद्याआड घडामोडी वेग घेत असून, अंतिम क्षणापर्यंत खोपोलीतील राजकारण रंगतदार राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.