सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : सीपी तलाव कचरामुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने केलेले सर्व प्रयत्न पुन्हा कचऱ्यात जमा झाले आहे. अवघ्या काही महिन्यांतच येथील कचरा हस्तांतरण भूमीवर कचऱ्याचे डोंगर उभे राहू लागले आहेत. डायघर येथे कचरा टाकण्यास स्थानिकांनी केलेल्या विरोधाचा हा फटका आहे. शिवाय, आतकोलीचा प्रवास खर्च परवडत नसल्याने ठेकेदाराने कचरा वाहतुकीला ब्रेक लावला आहे. या सर्वांचा त्रास या परिसरातील रहिवाशांना होत असून दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघात येणारा सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्र गेल्या काही वर्षांपासून वादात सापडले आहे. वागळे परिसरात असलेल्या या केंद्रात शहरातील कचरा गोळा करून पुढे तो प्रकल्पस्थळी मार्गस्थ करणे अपेक्षित आहे; मात्र कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यानंतरही महिनोंमहिने कचरा त्याच ठिकाणी साचून त्याचे डोंगर उभे राहिले होते. यावरून काही महिन्यांपूर्वी राजकीय राडेबाजीही झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शिंदे यांच्या शिलेदारांनी पालिका मुख्यालयात ठिय्या घालूनही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला; पण तेही निष्फळ झाल्याने अखेर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रशासनाला तंबी द्यावी लागली. त्यानंतर यंत्रणा हलली आणि सीपी तलाव कचरामुक्त झाला; पण हा आनंद काही काळही टिकला नाही.
डायघर कचरा प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांनी घंटागाड्यांना गावात प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहराची कचराकुंडी होण्यास सुरुवात झाली आहे. आतकोली येथे शहरातील कचरा टाकला जात असून त्यात आता दिवा, कळवा, मुंब्य्राच्या कचऱ्याचीही भर पडली आहे. परिणामी, या जाचातून सीपी तलाव हस्तांतरण केंद्रही सुटलेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून शहरात गोळा होणारा कचरा येथे आणून टाकला जात आहे. हा कचरा आतकोली येथे वाहून नेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आले असल्याचे समजते; मात्र वागळे ते भिवंडी हा लांबलचक प्रवासाचा खर्च परवडत नसल्याने येथील कचरा उचलला जात नसल्याचे कारण समोर आले आहे. या परिसरात कचऱ्याचे ढीग साचत असून त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने दुर्घंधी वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे.
प्रशासनाचे अपयश
स्मार्ट सिटीकडे झेप घेणाऱ्या ठाणे शहरात कचऱ्याची समस्या उग्र होऊ लागली आहे. वागळे भागात असलेल्या सीपी तलाव भागात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सी कचरा संकलन केंद्र बंद करू, असे पालिका प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन कचऱ्यात गेले असून सीपी तलाव कचरामुक्त करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
संघर्ष पेटणार
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सीपी तलाव हा कळीचा मुद्दा ठरला होता. आता आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा तीच समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे वागळे येथील सत्ताधारी माजी नगरसेवकांना मतदारांना तोंड देणे अवघड जाणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांना आयता मुद्दा हाती मिळाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्यास पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचे राजकारण पेटणार असून संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.