श्रमजीवी संघटनेचा ‘कृतज्ञता दिवस’ म्हणून ४४वा वर्धापन दिन!
नवा निर्धार करीत संविधान दिनही होणार साजरा
विरार, ता. २५ (बातमीदार) : श्रमजीवी संघटना महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे आपल्या संघर्षमय वाटचालीची ४३वी वर्षपूर्ती आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव (७५ वर्षे) हे दोन्ही महत्त्वपूर्ण दिवस बुधवारी (ता. २६) राज्यभरातील गावापाड्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे करणार आहे. संघटनेचा वर्धापन दिन ‘कृतज्ञता दिवस’ म्हणून आणि त्याच दिवशी संविधान दिन एकत्रितरीत्या साजरा करण्याची जय्यत तयारी गावपातळीवर सुरू आहे.
श्रमजीवी संघटनेस आजचा भक्कम पाया उभा करण्यासाठी गेल्या चार दशकांमध्ये मोठे बलिदान द्यावे लागले. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संस्थापिका विद्युल्लता पंडित यांच्यासह असंख्य ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हल्ले सोसले, तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणही गमवावे लागले. याच त्यागामुळे आज संघटना आदिवासी, कातकरी आणि कष्टकरी घटकांच्या प्रश्नांवर ताकदीने उभी आहे. या संघर्षाची कृतज्ञता व्यक्त व्हावी, हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि तरुणांनी न्याय्य हक्कांसाठी संघटित व्हावे, या उद्देशाने दरवर्षी वर्धापन दिन कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
२६ नोव्हेंबरला सर्व गावकमिट्यांत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व गावांमध्ये पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. यामध्ये ग्रामदेवतेचे पूजन तसेच संघटनेच्या प्रतीमांचे पूजन, ध्वजारोहण आणि संविधानातील मूलभूत अधिकारांचा निर्धार, गावपाड्यात संघटनेच्या नामफलकांचे उद्घाटन आणि बाल संघटना शाखांचे उद्घाटन, संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन, समाजातील वंचित गरीब कातकरींच्या समस्यांवर एकत्रित कृती करण्याबाबत निर्धार असे कार्यक्रम पार पडतील.
प्रवास नव्या पिढीला दिशा देणारा
संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, आदिवासी कातकरींचे स्थलांतर थांबवणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान तसेच रात्री आदिवासी पारंपरिक नृत्ये, सांस्कृतिक कार्यक्रम व मुलांच्या नाटुकल्याही सादर केल्या जातील. ७५ वर्षे संविधानाची आणि ४३ वर्षांचा श्रमजीवी संघटनेचा संघर्षाचा प्रवास या दोन शक्ती नव्या पिढीला दिशा देणाऱ्या आहेत. इतिहासाची कृतज्ञता, वर्तमानाचा संघर्ष आणि भविष्याचा निर्धार यातून आम्ही पुढील लढ्याची वाटचाल ठरवणार आहोत, अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.