महापालिकेत ठाणेकरांवरील अन्याय थांबणार
पालिकेची कडक शिस्तबद्धता; काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ठाणे महापालिकेच्या कामकाजातील वाढता ढिसाळपणा, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती आणि नागरिकांकडे होणारे दुर्लक्ष यावर काँग्रेसने दाखवलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेला अखेर यश आले आहे. प्रशासनाने तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेच्या सर्व विभागांवर शिस्त लावण्यासाठी परिपत्रक जारी केले असून, यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखी कडक होणार आहे.
ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी वाढत्या अनियमितता आणि माहितीचा अधिकार कायद्याचे उल्लंघन यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. महापालिका प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. यानुसार आरटीआयमध्ये नमूद १७ बाबींची माहिती तिमाही अद्ययावत करून ती कार्यालयाच्या दर्शनी भागात आणि महापालिकेच्या वेबसाईटवर स्पष्टपणे प्रकाशित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी मागणी केल्यास सर्व अभिलेखांचे अवलोकन सहज उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिले आहेत. अभ्यागतांसाठी अभिप्राय फॉर्म ठेवणे, अधिकाऱ्यांनी निश्चित भेटीची वेळ कार्यालयाबाहेरील फलकावर नमूद करणे बंधनकारक करण्यात आले असून, भेटीस आलेल्या नागरिकांचे म्हणणे शांतपणे आणि पुरेसा वेळ देऊन ऐकण्याचा नियम कठोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यालयाबाहेर पडताना नोंदवहीत तशी नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ऊर्जा बचतीसाठी कार्यालयातून बाहेर जाताना एसी, पंखे आणि दिवे बंद ठेवण्याचे निर्देश परिपत्रकात आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, निवेदने आणि
पत्रव्यवहारावर शासनाच्या परिपत्रकानुसार विहित मुदतीत कार्यवाही करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेची प्रतिमा आणि शिस्त राखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र व गणवेश परिधान करणेही अनिवार्य केले आहे.
निर्देश
या सर्व आदेशांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत गतकाळातील नियमांकडे केलेल्या दुर्लक्षावर प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
काही निवडक अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम व हलगर्जी वागणुकीमुळे नागरिकांची गैरसोय वाढत होती आणि महापालिकेची प्रतिमा मलिन होत होती. या परिपत्रकामुळे आता शिस्त, पारदर्शकता आणि नागरिकांसाठी दिलासा या तिन्ही गोष्टींमध्ये मोठी सुधारणा होईल. प्रशासनाचे आम्ही आभारी आहोत.
- राहुल पिंगळे, मुख्य प्रवक्ता, ठाणे शहर काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.