भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा-भाईंदरची पाणीसमस्या कायमस्वरूपी दूर करणाऱ्या सूर्या पाणी योजनेसाठी १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा देण्यात तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी आवश्यक असलेले विजेचे खांब सीआरझेड क्षेत्रात टाकण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी अद्याप शिल्लक आहे. ही परवानगी डिसेंबरपर्यंत मिळण्याची अपेक्षा असून त्यानंतर पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत या योजनेतून पाणी मिळण्याची शक्यता आहे. सूर्या पाणीयोजनेचा आढवा घेण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. २५) मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते.
सूर्या पाणी योजनेचे पाणी मिरा-भाईंदरला मिळण्यासाठी १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा ही मुख्य अडथळा ठरत आहे. पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने होण्यासाठी डहाणू येथील पाणीपुरवठा केंद्राला १३२ केव्हीच्या वीजपुरवठ्याची आवश्यकता आहे. हा वीजपुरवठा सुरू करण्यास तांत्रिक मान्यता मंत्रालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. त्यासाठी विजेचे खांब टाकण्याचे काम वेगात सुरू आहे, परंतु यातील सात खांब हे सीआरझेडमधील क्षेत्रात टाकायचे आहेत व त्यासाठी आवश्यक असलेली उच्च न्यायालयाची परवानगी अद्याप हाती पडलेली नाही. उच्च न्यायालयात त्याची सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे. त्या वेळी परवानगी मिळाली तर पुढील दोन ते अडीच महिन्यांत खांब टाकण्याचे काम पूर्ण होईल व पाणीपुरवठा केंद्राला १३२ केव्हीचा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी मार्चमध्ये सूर्याचे पाणी मिरा-भाईंदरला मिळण्याची शक्यता आहे, मात्र ते उच्च न्यायालयाच्या परवानगीवर अवलंबून आहे.
नवीन वीजपुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरचा जलपुरवठा नियमित, सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजांस अनुरूप राहणार आहे. शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सूर्या जलयोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले.
जलवाहिनी अंथरण्याचा पहिला टप्पा डिसेंबर अखेर
सूर्याचे पाणी मिरा-भाईंदरच्या प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. त्याचे शहरांतर्गत वितरण करण्याची व्यवस्था उभारण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्याअंतर्गत जलवाहिन्या अंथरण्याचे व पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या कामाचा पहिला टप्पा यावर्षी डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. म्हणजेच सूर्याच्या सुमारे २१८ दशलक्ष लिटर पाण्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले, तर त्याचे डिसेंबर अखेर शहरात वितरण करण्यास महापालिकेची तयारी आहे. संपूर्ण काम जूनपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.