हाजी मलंग रोड-नेवाळी पट्ट्यात ड्रग्ज रॅकेट
१७४ नशेच्या बाटल्या जप्त; हिललाइन पोलिसांकडून कारवाई
उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा हिललाइन पोलिसांनी नशेच्या रॅकेटप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. हाजी मलंग रोडवरील काकडवाल गावात केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी विविध कंपन्यांच्या तब्बल १७४ नशेच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. जप्त मालाचे बाजारमूल्य ४६ हजार रुपये असून, या कारवाईमुळे परिसरात सक्रिय असलेल्या ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळण्याच्या दिशेने पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या कारवाईत पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ जितू ज्ञानदेव पावशे याला ताब्यात घेतले आहे. नेवाळी नाका परिसरात राहणारा पावशे हा अनेक महिन्यांपासून झोप आणि नशा निर्माण करणाऱ्या बाटल्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस हवालदार संदीप चव्हाण यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली असून, पावशेविरुद्ध हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंतरराज्यीय कनेक्शन?
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेली ही उत्पादने यापूर्वी देहरादून (उत्तराखंड) आणि चंडीगड यांसारख्या राज्यांतही जप्त करण्यात आली होती. यामुळे या रॅकेटचे आंतरराज्यीय कनेक्शन असल्याची शक्यता बळावली आहे.
टोळी सक्रिय असल्याचा संशय
आरोपी पावशे हाजी मलंग रोड-नेवाळी नाका परिसरातील व्यसनाधीन व्यक्तींना या बाटल्या विकत असे. या कारवाईमुळे पुरवठा साखळीतील एक दुवा तुटला असला तरी या रॅकेटच्या मागे मोठा गट सक्रिय असल्याची पोलिसांना शक्यता आहे. आगामी काही दिवसांत या नेटवर्कचा अधिक तपास करण्यात येत असून, आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.