उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : उल्हासनगरातील नव्याने झालेले सिमेंट काँक्रीट रस्ते वाहतुकीला वेग देत असताना, दुसरीकडे मात्र स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत आहे. कैलास कॉलनी ते नेताजी चौक आणि कुर्ला कॅम्प परिसरात भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची भीती वाढली आहे. यासाठी विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांनी महापालिकेला दिलेल्या अहवालात तातडीने रम्बलर्स, सफेद पट्टे आणि ब्लिंकर्स बसविण्याचे स्पष्टपणे सूचित केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रस्ताव निर्णायक ठरणार आहे.
शहरातील कैलास कॉलनी ते नेताजी चौक आणि कुर्ला कॅम्प परिसरातील नव्याने तयार झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांमुळे वाहने भरधाव येत आहे. या भागात पादचारी व दुचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू शकते, याची गंभीर दखल विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाने घेतली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांनी आयुक्तांना दिलेल्या अहवालात रस्त्यांची पाहणी करून इंडियन रोड क्रॉसच्या नियमांनुसार रम्बलर्स, सफेद पट्टे व ब्लिंकर्स बसविण्याची विनंती केली आहे. नागरिकांची सुरक्षा आणि अपघात रोखणे हे उद्दिष्ट ठेवून ही उपाययोजना अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वाहतूक विभागाकडून दिलेला हा सविस्तर अहवाल पालिकेसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
या ठिकाणांची शिफारस
कैलास कॉलनी चौक, दुर्गामाता मंदिर, कुर्ला कॅम्प पोलिस चौकी – शांतीप्रकाश हॉलसमोर, भाटिया चौक आणि नेताजी चौकच्या चारही बाजू आदी ठिकाणी रस्ते रुंद आणि सपाट असल्याने वाहनांचा वेग अनियंत्रित वाढतो. परिणामी, अपघातांचा धोका अधिक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने काम हाती घ्यावे, अशी मागणी विभागाने केली आहे.
नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात प्राधान्याची आहे. पादचारी, शाळकरी मुले, दुचाकीस्वार प्रत्येक जण सुरक्षित प्रवास करू शकेल, यासाठी रस्त्यांवर आवश्यक ती सुरक्षा साधने असणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच महापालिकेला रम्बलर्स, सफेद पट्टे आणि ब्लिंकर्स तत्काळ बसविण्याची विनंती केली आहे. योग्य वेळी उपाययोजना केल्यास अपघात टाळता येतात.
- अनिल पडवळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.