तलासरी, ता. २६ (बातमीदार) ः तलासरी पंचायत समितीच्या वार्षिक कामकाजाच्या तपासणीसाठी आयोजित बैठकीत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद पालघरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी प्रक्रिया पार पडली.
बांधकाम विभाग, ग्रामपंचायत विभाग, लघुपाटबंधारे आणि पंतप्रधान आवास योजना या विभागांमध्ये अपूर्ण असलेल्या कामांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष वेधले. घरकुले डिसेंबरअखेर शंभर टक्के पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे निर्देशही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. पशुसंवर्धन, कृषी, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण विभागांना लाभार्थ्यांची निवड करताना दुबार नोंदी टाळण्यासाठी कठोर पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले.
दररोजच्या कामकाजात अधिक तत्परता आणि पारदर्शकता यावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मसलत यांनी मार्गदर्शन केले. नव्याने नियुक्त झालेले आणि पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांनुसार आवश्यक प्रशिक्षण तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.