‘ना फेरीवाला, ना पार्किंग’ केवळ कागदावरच
कोलशेत रस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी, यासाठी कोलशेत रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालक वापर करू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी रुंद करण्यात आलेला हा मार्ग रस्त्यावर उसळलेल्या वाहनभारासोबतच फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. रस्ता ‘ना फेरीवाला क्षेत्र’ आणि ‘नो पार्किंग क्षेत्र’ म्हणून घोषित असला तरी प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्गाला विशेष महत्त्व आहे. यामार्गे गुजरात आणि ठाण्याकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने जातात. गेल्या काही वर्षांत घोडबंदर परिसरात वाढलेल्या नागरीकरणामुळे वाहतूक दाट झाली आहे. याशिवाय मुख्य व सेवा रस्त्यांचे काम, मेट्रो प्रकल्प आणि अनेक ठिकाणी झालेली रस्त्यांची दुरवस्था यामुळे घोडबंदर मार्गावरील कोंडी अधिक तीव्र झाली आहे. परिणामी सुरक्षित आणि तुलनेने मोकळा असलेल्या कोलशेत मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे. आता या मार्गावरही कोंडी वाढू लागल्याने नागरिक त्रस्त आहेत.
अति संवेदनशील क्षेत्र
कोलशेत रस्ता विस्तारीकरणानंतर काही काळ सुरळीत होता; परंतु डी-मार्टपासून कोलशेत गावापर्यंत आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून अकबर कॅम्पपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. पदपथ व रस्ता व्यापून ठेवणाऱ्या या गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह पानटपऱ्यांचा समावेश आहे. अनेक गाड्यांवर गॅस व स्टोव्हचा वापर होत असून, त्या उशिरापर्यंत सुरू राहतात. हा परिसर भारतीय वायू सेनेच्या स्थानकालगत असल्याने अति संवेदनशील मानला जातो. ज्वालाग्राही उपकरणांमुळे अपघाताची शक्यता असल्याने वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी पालिकेकडे तक्रारही नोंदवली होती.
फलक गायब
या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेने संपूर्ण मार्ग ‘ना फेरीवाला क्षेत्र’ व ‘ना पार्किंग क्षेत्र’ घोषित करून नियमावली तयार केली होती. परंतु हा निर्णय प्रत्यक्षात न अमलात आणल्याने परिस्थिती पूर्वपदावरच आहे. संबंधित भागात फलक लावण्याचा निर्णय असूनही ते अद्याप बसवलेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.