नवी मुंबईतील नगरसेवक हत्या प्रकरण :
सात वर्षांत काय तपास केला?
उच्च न्यायालयाची ‘सीआयडी’ला विचारणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : नवी मुंबईतील काँग्रेस नगरसेवक आनंद काळे यांच्या हत्येला १७ वर्षांचा दीर्घकाळ लोटला आहे. वीसहून अधिक तपास अधिकाऱ्यांनी तपास करूनही गुन्ह्याचा छडा लावता आलेला नाही, असा दावा करणारी याचिका काळे यांच्या मुलाने उच्च न्यायालयात केली आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेऊन तुम्ही आतापर्यंत काय तपास केला, त्याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पुणे गुन्हे अन्वषण विभागाला (सीआयडी) नुकतेच दिले.
या प्रकरणाचा सात वर्षांत तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि त्यांनी केलेल्या तपासाची माहिती सादर करा, असे आदेश न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजित भोसले यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले. काळे यांचा मुलगा प्रदीप यांनी ही याचिका दाखल केली असून, १७ वर्षांत पोलिसांना मारेकऱ्यांना अटक करता आलेली नाही. तसेच वडिलांची हत्या का केली याचा शोध घेता आलेला नाही, असा दावा केला आहे. या प्रकरणाचा तपास अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला; परंतु हा गुन्हा का करण्यात आला हे समजू शकलेले नाही, असे नमूद करणारा सारांश अहवाल पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात दाखल केल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. पोलिसांच्या अहवालाविरोधात याचिकाकर्त्याने कनिष्ठ न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी ती फेटाळली होती. पुढे हे प्रकरण पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाकडे वर्ग केले होते. सात वर्षांपासून हे भरारी पथक प्रकरणाचा तपास करीत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
प्रकरण काय?
१७ वर्षांपूर्वी २१ एप्रिल २००८ला नवी मुंबईतील ऐरोली परिसरात काँग्रेस नगरसेवक आनंद काळे यांची हत्या करण्यात आली होती. ऐरोलीच्या प्रभाग ११ मधून पहिल्यांदाच नगरसेवक झालेले आनंद काळे यांच्यावर दोन अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या त्यांची केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.