साईभक्तांसाठी पाच लाखांचे विमाकवच
संस्थानात ऑनलाइन नोंदणी अनिवार्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टतर्फे साईभक्तांसाठी पाच लाख रुपयांच्या विमा संरक्षणाची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. पायी पदयात्रा, खासगी वाहन किंवा सार्वजनिक वाहतुकीने शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र दर्शनार्थी म्हणून संस्थानात ऑनलाइन नोंदणी केली असणे बंधनकारक ठरणार आहे. दरवर्षी विशेषत: दिवाळीनंतर मुंबई आणि राज्यातील कडाक्याच्या थंडीत शेकडो पदयात्री शिर्डीकडे प्रस्थान करतात. अशा भक्तांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे साईभक्त मंडळाचे अध्यक्ष बाळू कहडणे यांनी सांगितले.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले, की घरातून शिर्डीकडे प्रवास सुरू करताना किंवा प्रवासादरम्यान झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाल्यास विमाकवच लागू राहील. पायी पालखीने येणाऱ्या सर्व मंडळांनी संस्थानकडे अधिकृत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी प्रत्येक भक्ताचे नाव आणि आधार क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे. वाहनातून येणाऱ्यांसाठीही हीच अट राहणार असून, संस्थानच्या कोणत्याही सुविधेसाठी पूर्वनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
संस्थानच्या या निर्णयाचे भक्तवर्गातून स्वागत होत असून, अधिकाधिक मंडळांनी ही माहिती लक्षात घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
.............................
पालखी सुरू करण्यापूर्वी सविस्तर माहिती संस्थानकडे द्यावी. तसेच एकटे किंवा कुटुंबासह दर्शनाला येत असल्यास ऑनलाइन नोंद आवश्यक आहे. लाखो भक्त शिर्डीत येतात त्यांच्या सुरक्षेसाठी ही योजना राबवण्यात आली असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
- गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान
....................................
शिर्डी पदयात्रेत काही वेळा अपघात होतात. साईबाबांची कृपा म्हणून भक्तांना आता विमाकवच मिळाले आहे.
- विवेक मुळे, आद्य पदयात्री (मुंबई–शिर्डी पदयात्रा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.