चिन्हे घरा-घरात पोहोचवताना अपक्षांची दमछाक
राजकीय पक्ष प्रचारात आघाडीवर; मतदारांमध्ये चिन्हांबाबत संभ्रम
रोहा, ता. २६ (बातमीदार) : रोहा अष्टमी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप उशिरा म्हणजे थेट बुधवारी (ता. २६) झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अपक्ष उमेदवारांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या निवडणूक चिन्हाची ओळख प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवणे ठरत आहे. शिवाय चिन्ह मिळाल्यानंतर लगेचच जाहिरात पत्रके छापणे, ती संपूर्ण प्रभागात वितरित करणे आणि मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, हे सर्व अत्यंत कमी कालावधीत करावे लागत असल्याने त्यांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे. निवडणुकीसाठीचे दिवस कमी उरल्याने त्यांना घरोघरी पोहोचणे कठीण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भाजप, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या राष्ट्रीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, प्रचारयंत्रणा वेगाने कार्यरत झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी उच्चशिक्षित वनश्री समीर शेडगे यांना, तर शिवसेना (शिंदे गट) यांनी माजी नगरसेविका शिल्पा अशोक धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. एकूण २० नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत असून, त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. उर्वरित १९ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे १९, शिवसेना (शिंदे गट) व भाजप युतीचे १५, काँग्रेसचे ५ तर शिवसेना (उबाठा) गटाचे ४ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ८ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे, तर शिवसेनेत ऐनवेळी प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाहा यांनाही शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले आहे.
.................
जोमाने प्रचाराला सुरुवात
पक्षाच्या अधिकृत चिन्हांमुळे राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचारात नैसर्गिक आघाडी मिळाली आहे. मात्र अपक्ष उमेदवारांची चिन्हे नवीन असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. उमेदवारांचे चेहरे ओळखीचे आहेत, पण चिन्ह लक्षात राहत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे उरलेल्या मोजक्या दिवसांत अपक्ष उमेदवारांना अधिक जोमाने प्रचार करत, मतदारांपर्यंत स्वतःची ओळख आणि चिन्ह पोहोचवणे हे मोठे आव्हान ठरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.