वज्रेश्वरी, ता. २७ (बातमीदार) : भातझोडणीनंतर उरणाऱ्या तणापासून तयार होणाऱ्या मोडल्यांच्या (पावाली) विक्रीतून शेतकऱ्यांना शेतीकामासाठी लागणाऱ्या खर्चाची मोठी तजवीज होते. ही पावाली अनेक शेतकऱ्यांसाठी झोडणी, मळणी, वाढवणी, भरडाई तसेच रब्बी हंगामातील मजुरी भागवण्यासाठी महत्त्वाचा आर्थिक आधार मानली जाते. मात्र, अनेक वर्षांपासून पावालीच्या दरात वाढ न होणे आणि यंदा अपेक्षित भाव न मिळाल्याने ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित विस्कळित झाले आहे.
यंदाच्या हंगामात पाऊस लांबला आणि भाताचे पीक शेतातच भिजल्याने तणाचा चारा काळा पडला. चाऱ्याचा दर्जा खालावल्यामुळे चांगल्या प्रतीच्या मोदल्यांचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. परिणामी, झोडणीपासून रब्बी हंगामापर्यंतच्या सर्व शेतीकामांसाठी लागणाऱ्या खर्चाची अधिकतर तरतूद शेतकऱ्यांना करावी लागत आहे.
ठाणे जिल्हा आणि भिवंडी ग्रामीण, अंबाडी, घोटगाव, वेढे, मोहिली, दुगाड, कोशिंबे, वडवली, दाभाड, खंबाळा, किरवली या भागांमध्ये भातशेती हे मुख्य पीक आहे. पावसामुळे झालेले मोठे नुकसान सांभाळूनही सध्या झोडण्या जोरात सुरू आहेत. दिवाळीनंतर या कामात अधिक वेग आला आहे. झोडणीनंतर उरणाऱ्या भात तणाचे मोदले तयार करून शेतकरी त्यांची विक्री करतात. चालू वर्षी भिजलेल्या तणामुळे पावालीचा दर्जा घसरला असून दर १५ ते २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना केवळ दीड ते तीन हजार रुपये मिळत असून सुमारे ३ ते ५ हजारांचा थेट तोटा होत आहे. दर घसरल्यामुळे झोडणीपासून रब्बी हंगामापर्यंतच्या सर्व शेतीखर्चासाठी अधिक आर्थिक तरतुदीची गरज निर्माण झाली असून हा भार शेतकऱ्यांच्या खांद्यावर अधिकच जड झाला आहे.
उत्पनाचा आधार
ही पावाली ठाणे व पालघर जिल्ह्यात विशेष मागणी असलेली आहे. महिनोन्महिने टिकणारी आणि जनावरांना आवडणारी असल्याने दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून थेट शेतात येऊन रोखीने खरेदी केली जाते. या विक्रीतून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते. कसदार जमिनीप्रमाणे एका एकरातून साधारण १५० ते २०० मोदले तयार होतात. चांगल्या प्रतीचा दर्जा मिळाल्यास एका मोदल्याला ३० ते ३५ रुपये भाव मिळून एकराला ५ ते ७ हजार रुपये उत्पन्न मिळते.
खर्चाची तरतूद
यंदा परतीच्या जोरदार पावसाने भिजलेल्या तणाची पावाली काळी पडल्याने मोदल्यांच्या भावात घसरण झाली आहे. याचा फटका बसल्याने शेती कामासाठी लागणाऱ्या खर्चाची अधिक तरतूद करावी लागत आहे, असे मत किरवलीचे शेतकरी शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.