उल्हासनगरात मतदानाला येणार ‘महाराष्ट्र’?
विचित्र नोंदीवरून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र नोंद समोर आल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे. पॅनेल क्रमांक १९ मधील मतदार यादीत ५७ वर्षीय ‘महाराष्ट्र’ नावाची महिला मतदार म्हणून नोंदवल्याचे अधिकृत दस्तऐवजांमध्ये आढळले आहे. राज्याचे नावच थेट मतदार म्हणून समोर येत असल्याने निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि याद्यांच्या विश्वसनीयता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गुरुवारी (ता. २०) जाहीर झालेल्या मतदार याद्यांमध्ये पॅनेल क्रमांक १९ मधील मतदार क्रमांक २१,७५९ वर, क्रमांक ३२४च्या यादीत, ‘महाराष्ट्र’ नावाची ५७ वर्षीय महिला मतदार म्हणून नोंदली गेली आहे. ही विचित्र नोंद पाहताच नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयात चर्चेला उधाण आले आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव ‘महाराष्ट्र’ असू शकते का?, नाव लिहिताना ही केवळ तांत्रिक चूक झाली आहे का की मतदार याद्यांमध्ये फेरफार करून निवडणूक प्रक्रियेला कलाटणी देण्याचा हा भाग आहे, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत अनेक टप्प्यांवर पडताळणी केली जात असल्याने, ‘महाराष्ट्र’ राज्याचे नाव थेट व्यक्तीच्या नावाच्या ठिकाणी नोंदवले जाणे हे केवळ दुर्लक्ष नसून गंभीर फेरफार असल्याची शक्यता नागरिक आणि विरोधक व्यक्त करत आहेत. यापूर्वीही याद्यांमध्ये चुकीची नावे, मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी याबद्दल तक्रारी येत होत्या. आता ‘महाराष्ट्र’ नावाची ही नोंद म्हणजे ‘तेलात ठिणगी टाकण्यासारखा’ प्रसंग ठरला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढले आहे.
सखोल तपास करण्याची मागणी
ही संबंधित यादी तपासून चूक त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यामध्ये जाणूनबुजून गडबड झाली का, याचा सखोल तपास करण्याची मागणी होत असून, निवडणूक विभाग आणि महापालिकेने या मुद्द्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्याची जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.