सत्ताधाऱ्यांचे उरण शहराकडे दुर्लक्ष
महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांचा आरोप
उरण, ता. २७ (वार्ताहर) : गेल्या २० वर्षांपासून उरण नगर परिषद परिसराचा अपेक्षित विकास झाला नसून सत्ताधाऱ्यांनी शहराला भकास स्थितीत ढकलल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी केला आहे. आता फक्त आश्वासनांची नव्हे तर प्रत्यक्ष काम दाखवण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पराभूत करून उरणमधील राक्षसी राजवटीचा शेवट केला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मोरा गावात पार पडलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमद गणेश शिंदे यांच्यासह आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सभेत बोलताना भावना घाणेकर यांनी उरण नगर परिषदेत भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली. गेल्या २० वर्षांत शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. कचरा व्यवस्थापन बिघडले असून रस्ते, गटारे, पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांची अवस्था दयनीय आहे. या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. या सभेत राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे युवा नेते फहाद अहमद, शिवसेनेचे गणेश शिंदे, शेकापचे रवी घरत, तसेच महाविकास आघाडीचे नगरसेवक उमेदवार यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व वक्त्यांनी शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. या जाहीर सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती. उपस्थित मतदारांमध्येही बदलाची भावना स्पष्टपणे दिसून आली असून, येणाऱ्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा सर्वात केंद्रस्थानी राहणार असल्याचे चित्र सध्या उरणमध्ये पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.