पालघर, ता. २७ (बातमीदार) : आगामी निवडणुकांमध्ये कुणबी सेना पूर्णतः तटस्थ भूमिका घेणार असून, कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार अथवा समर्थन न करण्याचा ठाम व स्पष्ट निर्णय घेण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कुणबी समाजावर अन्याय केला आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी कुणबी सेनेने बैठक घेऊन ठराव करण्यात आले.
पालघर आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील कुणबी सेनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची तातडीची बैठक बुधवारी (ता. २६) विक्रमगडमधील रामवाडी येथे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत समाजाच्या अस्तित्वाशी, हक्कांशी आणि स्वाभिमानाशी निगडित अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत नगरपरिषद निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार अथवा समर्थ न करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.
शिंदे सरकारच्या काळात ५७ लाख मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यात आले, तर फडणवीस सरकारच्या काळात हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून दोन कोटी मराठे कुणबी समाजात येऊ घातल्याने हा कुणबी, तसेच ओबीसी समाजावर घाला असून, याचा सभेत तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. कुणबी समाजाला केवळ मतांसाठी वापरणाऱ्या आणि निवडणुकीपुरते आठवण काढणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना आता जाणीवपूर्वक आणि उघडपणे धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला.
समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर फक्त पोकळ आश्वासने देऊन फसवणूक करणाऱ्या पक्ष आणि नेत्यांविरोधात आंदोलनात्मक संघर्ष छेडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. शिक्षण, रोजगार, आरक्षण, शेतकरी प्रश्न व तरुणांचे भवितव्य या ज्वलंत प्रश्नांवर आक्रमक जनजागृती मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाडा तालुक्यात भूमिपुत्रांची एल्गार सभा
अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान, वाडा तालुक्यातील टायर, लोखंड आदी कंपन्यांकडून सुरू असलेले प्रदूषण, खावडा टॉवर लाईन्स, त्र्यंबक-मोखाडा-जव्हार-विक्रमगड-मनोर-पालघर रस्ता रुंदीकरण बाधित शेतकरी यांची ५ डिसेंबरला दुपारी तीन वाजता वाडा तालुक्यातील मौजे पाली येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे भूमिपुत्रांची एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.