मी शिव्या-शाप देणार नाही!
बदलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विस्तार, सिमेंट काँक्रीट रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटार यांसह अनेक विकासकामांसाठी मी निधी मंजूर करून दिला आहे. आज प्रचार सभेत मी टीकाटिप्पणी करण्यासाठी किंवा शिव्यांची उधळण करण्यासाठी आलो नाही, तर झालेली आणि होणारी विकासकामे मांडण्यासाठी आलो आहे. ज्यांच्याकडे दाखवायला कोणतीही विकासकामे नाहीत तेच फक्त आरोप-प्रत्यारोपाने शिव्या-शाप देणार. त्यामुळे त्यांना तसे करू द्या, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली.
बदलापूरमध्ये भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस, आरपीआय महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा झाली. या वेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले, आमदार कुमार आयलानी, आमदार सुलभा गायकवाड, निरंजन डावखरे, सुभाष गोटीराम पवार, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील आणि बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे, भाजपा, राष्ट्रवादी व आरपीआय गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. २०१४ नंतर बदलापूरच्या विकासाला गती मिळाली असून, विविध सुविधांसाठी निधी मिळाल्याने शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. शहरासाठी मेट्रो १४चे काम पुन्हा गतिमान केले असून, १८ हजार कोटींच्या टेंडरनंतर ते पुढील पाच वर्षांत पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. चिखलोली ते बदलापूर मेट्रो विस्तारासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले. बदलापूर-कर्जत लोकल मार्गाला मंजुरी मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत यासोबतच रोजच्या लोकल या अधिक वेगवान, त्यात वाढीव डबे, मेट्रोसदृश कोच तसेच सेकंड क्लास प्रवासाच्या दरात त्या सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
----
नागरी सोयींचा दर्जा उंचावणार
पिण्याच्या पाण्यासाठी शिलाहार आणि पोशिर धरणांना मंजुरी, ३५० कोटींची भुयारी गटार योजना, अमृत योजनेतून मिळणारा निधी आणि घनकचरा व्यवस्थापनातील नवीन प्रकल्प यामुळे बदलापूर-अंबरनाथ परिसरातील नागरी सोयींचा दर्जा उंचावणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप–राष्ट्रवादी–आरपीआय महायुतीला सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच केंद्र, राज्य आणि त्यानंतर शहरातदेखील एकसंध सरकार हवे असेल तर भाजपा, राष्ट्रवादी व आरपीआय युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना भरघोस मतदान करा. त्यानंतर पुढील पाच वर्षांची काळजी आम्ही घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.