पोलिस जनतेचे मित्र : न्या. पाजणकर
‘माझ्या पोलिस ठाण्याला भेट द्या’ अनोखा उपक्रम
ठाणे, ता. २९ ः पोलिस जनतेचे मित्र आहेत, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. तुमच्यावर झालेला अन्याय, शोषण तुम्ही नि:संकोचपणे त्यांना सांगा. त्यांना तुमच्या-आमच्या हक्काच्या रक्षणासाठी येथे तैनात करण्यात आले आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजणकर यांनी केले. विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या वतीने ठाणे पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ‘माझ्या पोलिस ठाण्याला भेट द्या’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी उपक्रमाची सुरुवात न्या. पाजणकर यांच्या हस्ते नौपाडा पोलिस ठाण्यातून झाली. त्या वेळी ते उपस्थित शालेय विद्यार्थी आणि लोकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
सामान्य नागरिक पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वेळेस त्याच्यावर अन्याय झालेला असतानाही तो तक्रार नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्याला जाण्याचे टाळतो. असे कदापि होता कामा नये. कारण पोलिस पीडितांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी पोलिस ठाण्यात तैनात असतात. न घाबरता पीडितांनी त्यांच्याकडे तक्रार घेऊन जायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पोलिसांविषयी मनात भीती बाळगता कामा नये. चुकीचे कृत्य केले नसेल तर पोलिस आपले मित्र, संरक्षक बनून राहतात, असे मार्गदर्शन रवींद्र पाजणकर यांनी ठाण्यात केले. याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त संभाजी जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, संस्थेचे संस्थापक अबिद अहमद, शालेय विद्यार्थी, पोलिस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
३५ पोलिस ठाण्यांत उपक्रम
‘माझ्या पोलिस ठाण्याला भेट द्या’ हा उपक्रम ठाणे पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांत शनिवारी (ता. २९) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राबविण्यात आला. पोलिस नागरिकांच्या सेवेसाठी आहेत. त्यामुळे त्यांच्यातील नात्यात भय नसावे. चांगल्या सामान्य माणसांना प्रत्येक पोलिस ठाणे आपले वाटावे. तेथे त्यांना मदत घेण्याची भीती, संकोच वाटू नये, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठीच विधी सेवा प्राधिकरण, ठाणे पोलिस आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. ग्लोबल केअर फाउंडेशनने याकरिता प्रथम ठाण्याची निवड केली असून, त्यानंतर मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर पोलिस ठाण्यांमधून हा कार्यक्रम घेतला जाणार असल्याचे संस्थेच्या ॲड. अफसा खान यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.