डोंबिवलीकरांचा पाणीप्रश्न सुटणार!
नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १५० एमएलडीवरून थेट ३०० एमएलडी वाढणार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः शहरात गेल्या काही महिन्यांपासून जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नेतिवली टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या १५० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमतेने कार्यरत असलेले हे केंद्र आता ३०० एमएलडीवर नेण्यात येणार आहे. या विस्तारामुळे डोंबिवली शहराचा पुढील २५ वर्षांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार, अशी माहिती भाजपचे डोंबिवलीतील कार्यकर्ते दीपेश म्हात्रे यांनी दिली.
मुबलक पाऊस पडूनही विविध भागांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त होते. ही समस्या गंभीर होण्यापूर्वीच तातडीचे उपाय करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने दीपेश म्हात्रे यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसह नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केंद्राचे आहे त्या जागेत उन्नतीकरण केल्यास, क्षमता वाढीव १५० एमएलडीने वाढवून एकूण ३०० एमएलडी केल्यास शहराचा पुढील २५ वर्षांचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निधीसाठी प्रयत्न सुरू
दीपेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना जलशुद्धीकरण केंद्राच्या उन्नतीकरणासाठी विस्तृत निधीचा आराखडा तयार करण्याची सूचना केली. हा आराखडा आणि प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी म्हात्रे यांनी दिली.
जुन्या जलवाहिन्या बदलणार
जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढल्यानंतर पाणी वितरण व्यवस्थेतील जुन्या समस्या सोडवण्यासाठी वितरण जलवाहिन्या बदलण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या ३५ वर्षांपूर्वीच्या असल्याने त्या गंजलेल्या आहेत, ज्यामुळे पाण्याची मोठी गळती होते. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी तसेच वाढत्या वस्तीत पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी कचोरे, देवीचापाडा, मोठागाव, जुनी डोंबिवली आणि कोपर या मार्गांवर नवीन जलवितरण वाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे.
नागरिकांना मुबलक पाणी
नवीन जलवाहिन्यांमुळे जुन्या वाहिन्यांवरील पाण्याचा ताण कमी होऊन नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. नवीन धरणांमधून कल्याण-डोंबिवली शहरांना वाढीव पाणीपुरवठा मिळवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिका अभियंत्यांच्या मते, शासनाने हा विस्तृत आराखडा मंजूर करून तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यास ही कामे लवकर सुरू करता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.