खारघर, ता. २९ (बातमीदार) : खारघर परिसरात तीन दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला; मात्र त्यानंतर केवळ दीड तासांनंतर पुन्हा गायब झाल्यामुळे रहिवाशांना पाणी विकत घेत तहान भागवावी लागली. सिडको प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिडकोकडून पेण येथील सापोली गावाजवळ हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. २७) सकाळी सहा६ ते शुक्रवारी (ता. २८) दुपारी १२ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला होता. त्यामुळे तब्बल ३० तास खारघर, तळोजा, उलवे आणि द्रोणागिरी नोड आदी भागांत पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू राहील, असे आश्वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले होते; मात्र शनिवारी (ता. २९) सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला आणि १० वाजल्यानंतर पुरवठा बंद झाला. त्यामुळे रहिवाशांना अडीच ते तीन हजार रुपये खर्च करून खासगी टँकर बोलवावे लागले.
बहुतांश टँकरचे पाणी हे कूपनलिका अथवा विहिरीचे असल्यामुळे पैसे देऊन आजार ओढवण्याऐवजी ८० ते ९० रुपये खर्च करून नागरिकांना पाण्याचे मोठे कॅन विकत घ्यावे लागले. तीन दिवस घरात पाणी नसल्यामुळे अनेकांनी हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता, जेवण केले. काहींनी दोन दिवसांपासून अंघोळ केली नसल्याचे सांगितले.
प्रतिनिधी गायब
पाण्यासाठी नागरिकांची ओरड असताना एकाही राजकीय व्यक्तीने सिडको अधिकाऱ्यांना या समस्येविषयी विचारणा केली नाही. निवडणुकीच्या वेळी पाणीसमस्या सोडविण्याचे प्रलोभन दाखवतील; मात्र या वेळी मतदान करताना विचार करावा लागेल, असेही काही नागरिकांनी सांगितले.
तळोजा वसाहतीत पाणीपुरवठा
सिडकोने शुक्रवारी पालिकेकडून पाणी तळोजावासीयांना उपलब्ध करून दिल्यामुळे ते शांत असल्याचे दिसून आले. सिडकोने तळोज्यातील गृहप्रकल्पाची जाहिरात प्रसिद्धी केल्यामुळे तळोजा वसाहतीत पाणी उपलब्ध करून दिले असावे, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
लवकरच सुरळीत होणार
सिडकोकडून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. खारघर परिसरातील जलकुंभामध्ये पाणी साठवून सर्व सेक्टरमध्ये वितरण केले जात आहे. दोन दिवस कमी दाबाने पुरवठा होईल. त्यानंतर सुरळीतपणे पुरवठा होईल, असे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. व्ही. गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.