घोडबंदर रोड सेवा रस्ता विलीनीकरणाला विरोध
आमदार केळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या सेवा रस्ते विलीनीकरणाच्या कामाला आता स्थानिक नागरिकांसह आमदार संजय केळकर यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. केळकर यांनी हा रस्ता जोडणीचा निर्णय अयोग्य असल्याचा आरोप करीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर मागील काही वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रस्ता विलीनीकरणामुळे येथील कोंडी फुटणार असल्याचा दावा केला जात होता. त्यानुसार कापूरबावडी ते गायमुखपर्यंत दोन्ही बाजूचे सेवा रस्ते हे मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु हे रस्ता विलीनीकरणाचे काम अयोग्य असल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. संजय केळकर यांनीदेखील रस्ताजोडणी अयोग्य असल्याचा दावा केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले असून, भेटीसाठी त्यांच्याकडे वेळ मागितली असल्याची माहिती केळकर यांनी दिली.
घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण चालू आहे. तिथे सेवा रस्ता हा असलाच पाहिजे, अशी सर्व घोडबंदरवासीयांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेला मोठ्या मताधिक्याने नागरिकांनी भाजपला निवडून दिले. गेल्या ४० वर्षांत असे निवडून कोणी आले नाही. लोकांना विकास हवा आहे, लोक विकासाच्या पाठीशी उभे राहतात, असे स्पष्ट मत केळकर यांनी व्यक्त केले.
काँग्रेसवर टीका
काँग्रेसने त्यांच्या पायाखाली काय जळतंय ते बघितलं पाहिजे. काँग्रेसमुक्त भारतकडे वाटचाल सुरू आहे. नगर पंचायत, नगरपालिकांमध्ये काँग्रेस कुठेच दिसत नाही. तुम्ही दुसऱ्यावर टीका करीत बसलात तर पूर्णच मुक्त व्हाल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे केळकर यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.