कल्याण-डोंबिवलीचे शाश्वत शहराकडे पाऊल
डोंबिवलीत दुसरा सोलर हायमास्ट कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः कल्याण-डोंबिवली पालिकेने शाश्वत विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत डोंबिवली पूर्वमधील इंदिरा चौकात दुसरा सोलर हायमास्ट सुरू केला आहे. आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते हायमास्टचे उद्घाटन रविवारी (ता. ३०) करण्यात आले.
अभिनव गोयल म्हणाले, महापालिका क्षेत्रातील प्रत्येक हायमास्ट आणि प्रमुख इमारती सौरऊर्जेवर आणणे हे आमचे स्पष्ट ध्येय आहे. शहरातील १४४ हायमास्ट पूर्णपणे सोलर प्रणालीवर चालवण्याचे नियोजन सुरू आहे, प्रशासकीय इमारतींवर सोलर प्रकल्पांची उभारणीही जलद गतीने सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सस्टेनेबिलिटी अँड सेफ्टी ऑफ सोसायटी बिल्डकॉन या उपक्रमांतर्गत महापालिका सोसायट्यांशी थेट संवाद साधत शाश्वत विकासासाठी सहकार्य वाढवत आहे. सोसायट्यांमध्ये सौरऊर्जा, सांडपाणी पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग यांवर भर देण्यात येत आहे.
गोयल यांनी नागरिक आणि सोसायट्यांनाही सौर पॅनेल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन आणि ग्रीन प्लांटेशनमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. ऊर्जा बचत, खर्चात बचत, प्रदूषण नियंत्रण आणि ग्रीन एनर्जी या चारही गोष्टींसाठी सौरऊर्जेचा उपाय महत्त्वाचा आहे. नागरिक सहभागी झाले तर कल्याण-डोंबिवली एक आदर्श ‘श्वाशत शहर’ म्हणून देशासमोर उभे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
निव्वळ शून्य ऊर्जा
पॅनासॉनीक इंडियाच्या सीएसआर निधीतून आणि पालिकेच्या विद्युत विभागाच्या पुढाकारातून हा उपक्रम प्रत्यक्षात आला आहे. कल्याणमधील गणपती चौकानंतर इंदिरा चौक हा दुसरा सोलर हायमास्ट सुरू झाल्याने पालिकेने ‘निव्वळ शून्य ऊर्जा’ संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त रूप देण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी पार केली आहे. शाश्वत, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-स्वयंपूर्ण शहराचा ध्यास घेतलेल्या महापालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विविध सौरप्रकल्प कार्यान्वित
पालिकेने आतापर्यंत केलेल्या उपक्रमांमध्ये महापालिका इमारतीवरील ०.४५ मेगावॉट सौरऊर्जेचे प्रकल्प, २५० पेक्षा जास्त इमारतींवर साडेचार मेगावॉट सौर प्रकल्प, उद्यान व स्मशानभूमींवरील सोलर व्यवस्था या सर्वांचा समावेश आहे. टिटवाळ्यातील पहिलं पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे उद्यानही लवकरच नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
१०० टक्के सौरऊर्जेवर
इंदिरा चौकातील नव्या हायमास्टचे वैशिष्ट्य म्हणजे तो शंभर टक्के सौरऊर्जेवर चालणार असून महावितरणच्या विजेवर अवलंबून राहणार नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही हा दिवा सुरळीत कार्यरत राहील. यामुळे शहरातील सुरक्षा तसेच प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.