डोंबिवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने
उद्घाटन सोहळ्यात शक्तिप्रदर्शन; राजकीय वातावरण तापले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली असून, निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखाण पाडा परिसरातील गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटन सोहळ्यात रविवारी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
उद्घाटन सोहळ्यापूर्वीच दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि शक्तिप्रदर्शन करण्यात आले. हा प्रभाग भाजपमधून शिवसेना शिंदे गटात गेलेले विकास म्हात्रे यांचा असल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. रविवारी (ता. ३०) सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर हा उद्घाटन सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. चव्हाण यांच्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) सोडून भाजपमध्ये आलेले दीपेश म्हात्रे हेदेखील उपस्थित होते.
विकास म्हात्रे यांच्या प्रभागात भाजपने मोठ्या प्रमाणात बॅनर आणि झेंडे लावत शक्तिप्रदर्शन केले. यावर विकास म्हात्रे यांच्या समर्थकांनीही शिवसेनेच्या छत्र्या घेऊन कार्यक्रमस्थळी गर्दी करीत आपली ताकद दाखवल्याचे दिसून आले. उद्घाटन सोहळा सुरू असताना रवींद्र चव्हाण कार्यक्रमस्थळी पोहोचताच वातावरण अधिक चिघळले. या वेळी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर जाणीवपूर्वक झाकण्यात आल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनीही प्रति-घोषणाबाजी करीत आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
मनसेच्या प्रवेशानंतर लगेचच भाजपने केलेले हे शक्तिप्रदर्शन शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत खुपल्याचे बोलले जात आहे. उद्घाटन सोहळा असूनही हा संपूर्ण कार्यक्रम राजकीय जोराजोरीचा आखाडा ठरला. बॅनरबाजी आणि घोषणाबाजीमुळे कुंभारखाण पाडा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विकास म्हात्रे यांच्या घराबाहेर तसेच कार्यक्रमस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.