बदलापूरमध्ये ‘धनुष्यबाणच घुमणार’
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात!
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलापूर पश्चिम येथील हेंद्रे पाडा परिसरातील घोरपडे मैदानावरील जाहीर सभेला शिवसेना (शिंदे गट) समर्थकांचा मोठा जनसमुदाय लोटला होता. नगराध्यक्षपदासाठी वीणा म्हात्रे आणि ४९ उमेदवार अशी ‘हाफ सेंच्युरी’ टीम उभी असल्याचे सांगत शहरात शिवसेनेचा विजय निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याचा निर्धार शिंदेंनी व्यक्त केला.
शीतल राऊत यांच्या बिनविरोध निवडीमुळे बदलापुरात शिवसेनेचे खाते शुभ संकेतांनी उघडले गेले आहे, असे सांगत शिंदेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. बदलापूर माझ्यासाठी नवीन नाही आणि मी बदलापूरकरांसाठीही नवीन नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला जुना संबंध अधोरेखित केला.
शिंदेंनी आपल्या भाषणात बदलापूर शहराला दिलेल्या शेकडो कोटींच्या निधीवाटपाची आकडेवारी मांडत विरोधकांना लक्ष्य केले. सिमेंट रस्त्यांसाठी ५०० कोटी, पाणीपुरवठ्यासाठी २४० कोटी, सांडपाणी योजनेसाठी १९० कोटी हा सगळा पैसा माझ्या खात्यातून बदलापुरात आला आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. शहरप्रमुख ‘गुपचूप’ निधी घेऊन जातात आणि शहरात कामे उभी करतात, असे कौतुक त्यांनी केले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मेट्रो चिखलोलीवरून बदलापूरपर्यंत आणण्याचे काम सुरू असून, भविष्यात शिलार पोशीर धरणाचे आश्वासनही त्यांनी दिले. ‘२६ हजार लाडक्या बहिणींनी मला आशीर्वाद दिला आहे; त्यांच्या चार सदस्यांच्या कुटुंबासह विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणारच,’ असा थेट हल्ला त्यांनी केला.
पोलिस प्रशासनालाही ‘सावध राहा’चा इशारा
सभेच्या अखेरीस शिंदे अधिक आक्रमक झाले. पदाधिकाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून दबाव येत असल्याच्या तक्रारींवर ‘आमचे तुमचे वैर नाही... सावध राहा,’ असा थेट इशारा त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला. बदलापुरातील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्री असताना आरोपीचा करेक्ट कार्यक्रम मीच केला होता, असे सांगत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेतील आपली कठोर भूमिका स्पष्ट केली. ‘आरोप करणाऱ्यांना करू द्या, मी कामातून उत्तर देतो,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. तसेच ‘२ डिसेंबरला बदलापुरात फक्त धनुष्यबाणच घुमणार,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार कथोरेंवर टीका
भाषणादरम्यान, आमदार किसन कथोरे यांचे नाव न घेता शिंदे यांनी टीका केली. ‘इथे कोणीही आप्पा गप्पा मारणार, पुढे कोणीही येऊ देत; निवडून फक्त शिवसेना येणार,’ असे ते म्हणाले. ‘काहीजण माझ्याकडून निधी घेऊन जातात; पण माझे नावदेखील घेत नाहीत,’ असे म्हणत त्यांनी विकासकामांचा ठोस पुरावा नसताना केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या गप्पा मारणाऱ्यांवर निशाणा साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.