वरसाळेत शिक्षकांची कमतरता
शाळेला टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा
वाडा, ता. ३० (बातमीदार) : वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरसाळे, जी ''मॉडेल स्कूल'' म्हणून ओळखली जाते, तिथे शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शिक्षकांची नेमणूक होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर शाळेला टाळे ठोकण्याचा गंभीर इशारा दिला आहे.
वरसाळे शाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण ४१७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या प्राथमिक विभागात (इयत्ता पहिली ते पाचवी) १४१ पट असताना, केवळ एकच कायमस्वरूपी शिक्षक कार्यरत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात एक शिक्षक मिळाल्याने शिक्षकांची संख्या दोन झाली आहे. पटसंख्येनुसार शाळेला एकूण चार शिक्षकांची गरज असतानाही, फक्त दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची तातडीने गरज आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बाळू कडाळी यांनी आरोप केला आहे की, जास्त पट असलेल्या व शून्य शिक्षकी शाळांवर अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेने माहिती मागवली होती, त्यातही वरसाळे शाळेचा उल्लेख करण्यात आला नाही.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत पटसंख्येनुसार आवश्यक शिक्षक शाळेला न मिळाल्यास, शाळेला टाळे ठोकले जाईल, असा अंतिम इशारा वरसाळे येथील ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला दिला आहे.
------------------------
दोन दिवसांपूर्वी मी व ग्रामस्थ शिक्षण विभागाकडे गेलो असता गटशिक्षणाधिकारी उमेश सातपुते यांनी आम्हाला ''त्यांनाच सर्व वर्ग शिकवायला सांगा, लाख लाख रुपये पगार घेतात ते काही फुकटचे घेतात का? दिवस-रात्र शिकवायला सांगा,'' अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले. एक जबाबदार अधिकारी अशा प्रकारची उत्तरे देत असतील, तर पालकांनी न्याय कोणाकडे मागायचा, हा खरा प्रश्न आहे.
बाळू कडाळी, माजी अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वरसाळे
------------------------
वरसाळे शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून येथे मुख्याध्यापक, सहशिक्षक व पदवीधर शिक्षक असे कार्यरत आहेत; मात्र एका शिक्षकाची येथे कमतरता आहे. येत्या शिक्षक समायोजनात या शाळेला एक शिक्षक देण्यात येईल.
उमेश सातपुते, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, वाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.