भटक्या श्वानांसाठी दत्तगुरूंकडे साकडे
शेल्टर, दवाखाने उभारण्याची पालिकेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० ः महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांना पळवून त्यांचे अवशेष विकणारी टोळी सक्रिय असल्याच्या संशयामुळे शहरातील श्वानप्रेमींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही श्वानांचे निर्बीजीकरण रखडलेले आहे. शहरात पुरेसे शेल्टर किंवा सरकारी दवाखाने नाहीत. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील श्वानप्रेमींनी दमाणी इस्टेट येथील दत्तमंदिरात थेट दत्तगुरूंना साकडे घालत पालिकेला ‘सद्बुद्धी’ देण्याची मागणी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या प्राणीमित्रांना मारहाण करणे आणि श्वान बेपत्ता होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार नरेश म्हस्के यांनीही याप्रकरणी ‘बिहारी टोळी’वर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे रविवारी (ता. ३०) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली प्राणीमित्र एकवटले आणि त्यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले, की ठाणे महापालिकाच या समस्येसाठी जबाबदार आहे.
पालिकेमध्ये निर्बीजीकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे. लसीकरण योग्य पद्धतीने होत नाही. श्वानांसाठी शेल्टर उभे करण्यात आलेले नाहीत. निर्बीजीकरण बंद असताना पकडलेले श्वान परत सोडले जात नाहीत, मग त्यांचे काय केले जाते? याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे, असे ठणकावून सांगितले. पालिका प्रशासन आपल्या जबाबदारीतून पळ काढत असल्याने आपल्या प्रिय प्राण्याचे रक्षण करण्याची जबाबदारी या वेळी श्वानप्रेमींनी थेट दत्तगुरूंवरच सोपवली. दमाणी इस्टेट येथील दत्तमंदिरात हे साकडे घालण्यात आले.
जाहीरनाम्यात मुद्दा घेणार
प्रशासन आपल्या जबाबदारीतून पळ काढत असल्यानेच प्राणीमित्रांनी आपल्या प्रिय प्राण्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी थेट दत्तगुरूंच्या चरणी सोपवली. मनोज प्रधान यांनी या वेळी बोलताना सांगितले, की ठाणे शहरात १२,५०० श्वान पालक आणि हजारो प्राणीमित्र आहेत. ते स्वतः श्वानपालक असल्याने त्यांना प्राणीमित्रांच्या व्यथा माहीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)च्या आगामी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात श्वान निर्बीजीकरण, श्वानांसाठी दवाखाना, शेल्टर आणि लसीकरण या मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.