नवी मुंबईत सार्वजनिक शौचालयांची नासधूस
पालिकेची डोकेदुखी वाढली; कारवाई करण्याचे संकेत
वाशी, ता. ३० (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरभर उभारलेल्या सुलभ शौचालये आणि सार्वजनिक सुविधा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. मात्र काही असामाजिक घटकांकडून या सुविधांची वारंवार तोडफोड होत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या घडामोडींमुळे पालिकेच्या उद्दिष्टाला प्रचंड आघात पोहोचत असून, कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहे.
नगरातील गणपती पाडा, रामनगर, मुकुंद कंपनी बसस्थानक, यादवनगर, इलठण पाडा आणि चिंचपाडा अशा झोपडपट्टी व गर्दीच्या भागांमध्ये लाखो रुपयांच्या निधीतून सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. मात्र रात्रीच्या वेळी काही असामाजिक घटक विद्युत दिवे, पाण्याचे नळ, रोषणाई, पाइपलाइन आणि पाण्याच्या टाक्यांचे पाईप फोडून टाकत आहेत. यामुळे नागरिक, विशेषतः महिलांना अंधारात गैरसोयीचा व असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. महापालिका तातडीने नासधूस झालेल्या शौचालयांची दुरुस्ती करून नवीन साहित्य बसवते; मात्र तोडफोड पुन्हा होत असल्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत आहे. पालिकेच्या व्यवस्थापनाद्वारे नेमलेले केअरटेकर फक्त सकाळच्या वेळेत उपस्थित राहतात. रात्री कोणतीही पाहणी नसल्यामुळे समाजकंटकांना या ठिकाणी विनाकारण त्रास देण्यास मोकळीक मिळते, अशी तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका सतत प्रयत्नशील असून, स्वच्छ आणि सुबक शहरी वातावरण तयार करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. तथापि, काही बेजबाबदार घटकांच्या वर्तनामुळे महापालिकेचा खर्च वाढत असून, नागरिकांचा त्रासही वाढतो आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये या प्रकारांबाबत प्रचंड नाराजी आहे आणि तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
.................
बॉक्स :
नागरिकांनी सतर्क राहून माहिती द्यावी
नवी मुंबई महापालिकेकडून उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाते. मात्र काही असामाजिक घटकांकडून तोडफोड होत असल्यामुळे नागरिकांनी अशा घटनांची तत्काळ माहिती पालिकेला द्यावी, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी केले आहे. या वेळी पालिकेने नागरिकांशी संवाद वाढवून रात्रंदिवस सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, स्वच्छतेसाठी उभारलेल्या सुविधांचे संरक्षण सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.