नगर परिषद निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण
उरण, ता. ३० (वार्ताहर) ः उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, येत्या २ डिसेंबरला पार पडणाऱ्या मतदानासाठी सर्व विभाग सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली. निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची सीलिंग प्रक्रिया पूर्ण झाली असून, यंत्रांची अंतिम तपासणीही पार पडली आहे.
उरण नगर परिषदेतील २१ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. नगरसेवकपदासाठी एकूण ४९ उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात उतरले असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. १० प्रभागांमध्ये विभागलेल्या नगर परिषद क्षेत्रात एकूण २९ मतदान केंद्रे तयार केली असून, मतदानासाठी २६ हजार २१४ मतदार नोंदणीकृत आहेत. सर्व मतदान केंद्रांवर पाच मतदान कर्मचारी व एक पोलिस शिपाई अशी मानक व्यवस्था करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक राखीव ईव्हीएम यंत्र उपलब्ध ठेवण्यात आले आहे. मतदानादरम्यान कोणत्याही मशीनमध्ये बिघाड झाल्यास त्वरित पर्यायी मशीन देण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथक तयार ठेवण्यात आले आहे. सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी सर्व यंत्रणा पुन्हा एकदा तपासून पाहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
..................
कायदा-सुव्यवस्थेसाठी उरण पोलिस ठाणे आणि मोरा सागरी पोलिस ठाण्याकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक काळात सहा पोलिस निरीक्षक, २९ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच २७१ पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त गस्त पथके, गाडी तपासणी आणि मोबाईल पॅट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, प्राथमिक उपचार पेटी, पंखे आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार व मदतनीसांचीही नियुक्ती केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.