पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १ : शहरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भिवंडी महापालिकेच्या ई-बस सेवा प्रकल्पाला गती मिळाली आहे. लवकरच भिवंडी-कल्याण-उल्हासनगर मार्गांवर ही सेवा सुरू होणार आहे. यासाठी सध्या शहरातील नागाव, टेमघर आणि कोंबडपाडा येथे चार्जिंग स्टेशनचे काम जोरात सुरू आहे.
सध्या भिवंडी महापालिकेची स्वतःची बस सेवा नसल्याने नागरिक कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेवर अवलंबून आहेत. मात्र, त्या बसही शहरातील सर्व भागांत जात नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे नागरिकांना रिक्षा भाडे, अव्यवस्थित खासगी वाहने आणि दैनंदिन प्रवासातील गैरसोयी यांचा सामना करून महागडा प्रवास करावा लागत होता. या समस्यांना पूर्णविराम देण्यासाठी भिवंडी-निजामपूर महापालिका पहिल्यांदाच नियोजित शहर बससेवा सुरू करत आहे. सरकारने भिवंडी शहरासाठी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्यास मान्यता दिली आहे. शहराच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
शहरासाठी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्यास सरकारची मंजुरी मिळाली आहे. यापैकी ७५ बस नऊ मीटर आणि २५ बस १२ मीटर लांबीच्या असतील. महापालिकेच्या मते, बससेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांपैकी ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नागाव, टेमघर आणि कोंबडपाडा येथील तीन चार्जिंग स्टेशन पूर्ण झाल्यानंतर बस मार्गांची घोषणा करण्यात येणार आहे. सध्या चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या विशेष निधीतून राबविला जात आहे. याशिवाय चार्जिंग स्टेशनसाठी स्वतंत्र १४.२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यापैकी १४.२१ कोटी रुपये वितरीत झाले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारचे ६० टक्के म्हणजेच ११.२९ कोटी रुपये आणि राज्य सरकारचे ४० टक्के म्हणजेच ७.५३ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. या व्यतिरिक्त चार्जिंग स्टेशनसाठी १४.२७ कोटी रुपये स्वतंत्रपणे मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १४.२१ कोटी रुपये आधीच मंजूर करण्यात आले आहेत.
रुग्णालये, शाळा, बाजारपेठ आणि रोजगार क्षेत्रांपर्यंत परवडणारी, सुरक्षित आणि नियोजित बस सेवा उपलब्ध होत असल्याने हा प्रकल्प भिवंडीकरांसाठी मोठा बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
विद्यार्थ्यांसह कामगारांसाठी मोठा दिलासा
कल्याण रोडवरील विद्यार्थ्यांना धामणकर नाका-बीएनएन कॉलेजपर्यंत पोहोचण्यासाठी दरवेळी दोन रिक्षा बदलाव्या लागतात. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी मांडली. पद्मानगर येथील गोदामातील कामगारांनी सांगितले की, त्यांच्या पगाराचा मोठा हिस्सा प्रवासावर खर्च होतो. ई-बस सेवा सुरू झाल्यास त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. .
चार्जिंग स्टेशनचे तपशील
नागाव – ५,३६३.५० चौ.मी.
टेमघर – ४,४४३.२० चौ.मी.
कोंबडपाडा – ५,००० चौ.मी.
१४.२७ कोटी (निधी मंजूर)
१४.२१ कोटी (रुपये वितरीत)
---------
सरकारची आर्थिक मदत
केंद्र सरकार : ६० टक्के (११.२९ कोटी)
राज्य सरकार : ४०% (७.५३ कोटी)
इलेक्ट्रिक बस सुरू केल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. हवेची गुणवत्ता सुधारेल आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल, अशी अपेक्षा आहे. महापालिकेचे हे नवीन वाहतूक नेटवर्क कल्याण आणि उल्हासनगरलाही जोडेल. कल्याणमध्ये मुख्य फ्लीट कंट्रोल सेंटर असेल. यामुळे तिन्ही शहरांमधील संपर्क अधिक मजबूत होईल. नागाव आणि टेमघरमध्ये काम अंतिम टप्प्यात आहे, तर कोंबडपाड्यात चार्जिंग स्टेशनची तयारी वेगाने सुरू आहे. बससेवेच्या सुरुवातीमुळे शहरात प्रवास करण्याचा एक नवीन आणि विश्वासार्ह मार्ग सुरू होणार आहे.
- जमील पटेल, शहर अभियंता
भिवंडी निजामपूर शहर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.