भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात नळजोडण्यांवर बसविण्यात आलेली ५० टक्क्यांहून अधिक जलमापक यंत्रे (वॉटर मीटर) नादुरुस्त अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. ही जलमापके सहा महिन्यांहून अधिक काळ बंद राहिल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांना देण्यात आलेल्या प्रत्येक नळजोडणीला जलमापक यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रावरील नोंदीनुसार महापालिकेकडून नागरिकांना दर चार महिन्यांनी पाण्याची देयके पाठवली जातात. सध्या शहरातील जलमापकांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू आहे, परंतु या जलमापकांपैकी ५० टक्क्यांहून अधिक जलमापके नादुरुस्त अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना त्यावरील नोंद घेणे अशक्य झाले आहे.
पाण्याद्वारे येणारा कचरा, गाळ अडकून जलमापके नादुरुस्त होतात. त्याची वेळोवेळी दुरुस्ती करून घेणे अथवा ती बदलणे आवश्यक असते. जलमापके दुरुस्त करून घेण्यासाठी महापलिकेकडून कार्यशाळादेखील सुरू करण्यात आली आहे, मात्र तरीदेखील नागरिक जलमापके दुरुस्त करून घेण्यासाठी अथवा ती बदलण्यासाठी टाळाटाळ करतात. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जलमापक नादुरुस्त असेल, तर महापालिकेकडून सरासरीप्रमाणे देयक पाठविले जाते. त्यानुसार महापालिकेकडून सर्व नादुरुस्त जलमापकांसाठी सरासरीप्रमाणे देयके पाठविण्यात आली आहेत व त्यावर तसा उल्लेख करण्यात आला आहे.
अधिनियमातील तरतूदीनुसार सहा महिन्यांहून अधिक काळ जलमापक नादुरुस्त असेल, तर संबंधित नळजोडणी २४ तासांची सूचना देऊन खंडित करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. त्यामुळे नादुरुस्त जलमापके तातडीने बदलून त्याची माहिती महापालिकेला द्यावी. त्यानंतरच जलमापकाच्या नोंदीनुसार पाण्याची देयके पाठविण्यात येतील, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.