प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १ : वसई-विरार महापालिका हद्दीतील गोखिवरे-भोईदापाडा क्षेपणभूमीवर अनेक वर्षांपासून साचून राहिलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रशासनामार्फत काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण १५ लाख घनमीटर कचरा जमा होता. त्यापैकी साडेचार लाख घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. अद्याप १० लाख घटमीटर कचरा क्षेपणभूमीवर असून, टप्प्याटप्प्याने यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. शून्य कचरा मोहिमेकडील वाटचालीमुळे पर्यावरणाला हातभार लागण्यासाठी मदत ठरणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने शहरात एकल वापरातील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्यास प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात कापडी पिशव्या तयार करून नागरिकांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या हानीला आळा बसण्यास मदत होईल तसेच नागरिकांमध्ये कापडी पिशवी वापराची सवय दृढ होईल. याचबरोबर माहिती शिक्षण व संवाद घटकांतर्गत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात कचऱ्याची निर्मिती वाढू लागली आहे. कचराकुंडीतून वाहनांत जमा करून कचरा क्षेपणभूमीवर नेला जातो, मात्र २००९ पासून कचऱ्यावर प्रक्रिया होत नव्हती. प्रदूषण वाढत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरित लवादाने महापालिकेला दंड आकारत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले होते.
वसई-विरार महापालिकेने सद्य:स्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे, मात्र दैनंदिन वाढणारा तसेच अद्याप लाखो टन कचरा साचून असल्याने प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
प्रशासनाकडून विविध पावले
शहरातील स्वच्छता व्यवस्था, नागरिकांचा सहभाग, पर्यावरणाविषयी जाणीव व कचरा व्यवस्थापनाची गुणवत्ता सुधारणा व शून्य कचरा मोहिमेकडे प्रशासनाने मोर्चा वळवला आहे. १० लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून विविध पावले उचलली जाऊ लागली आहेत.
निर्माण होणारा कचरा
नाशवंत फळे, भाजीपाला, खाद्यपदार्थ, पिशव्या, बाटल्या, रद्दी पेपर, कागदी पुठ्ठे, कपडे, खेळणी, पादत्राणे तसेच काच व धातूच्या वस्तू, विविध उत्पादने.
पालिकेकडून कचराकुंड्या
घरगुती व व्यावसायिक स्तरावरील कचरा संकलन प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध व स्वच्छ पद्धतीने राबवण्यासाठी कचराकुंड्या वितरित केल्या आहेत. त्यामुळे कचरा संकलन करण्यास मदत व वाहनांच्या माध्यमातून क्षेपणभूमीवर नेणे शक्य होत आहे.
राडारोड्यासाठी प्रकल्प
महापालिका क्षेत्रामध्ये बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम प्रस्तावित असून, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पामुळे बांधकामातील अवशेष, ढिगारा व पाडकाम कचऱ्याचे पुनर्वापरयोग्य स्वरूपात रूपांतर व शहरातील अनियंत्रित कचरा विसर्जनावर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे.
वसई-विरार शहरातील घनकचरा संकलन व्यवस्थेला अधिक कार्यक्षम व शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून परिसरातील पर्यावरणीय होणारे परिणाम टाळण्यास मदत होणार आहे व स्वच्छताविषयक कामकाज अधिक सुकर होईल.
- अर्चना दिवे, उपायुक्त, वसई-विरार महापालिका
वसई-विरारमधील दैनंदिन कचरा - ७०० टन
क्षेपणभूमीवरील कचरा - १० लाख ३० घनमीटर
शात्रोक्त पद्धतीने विल्हेवाट - ४.७० लाख घनमीटर
कचरा संकलन - १४० मोठी, तर २०० छोटी वाहने
कचराकुंड्यांचे वितरण (२०२५-२६) - १२ हजार ५००
कापडी पिशव्यांचे उद्दिष्ट - एक लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.