पालघर, ता. ३ ः तारापूर औद्योगिक वसाहत ही दुर्घटनांमुळे धोकादायक बनली असून क्षेत्रासह कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेल्या पाच वर्षांत औद्योगिक वसाहतीत ९१ अपघात घडले असून त्यात ४८ कामगारांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तारापूर एमआयडीसी देशाच्या औद्योगिक प्रगतीला गती देणारे महत्त्वाचे केंद्र असले तरी सुरक्षेच्या ढासळलेल्या व्यवस्थेमुळे एमआयडीसी असुरक्षेचे केंद्रबिंदू बनली आहे. सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी, नियमांचे कठोर पालन, आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान, पारदर्शक तपासणी आणि कामगारांच्या प्रशिक्षणाला प्राधान्य नसल्याचे दिसत आहे.
गजबजलेल्या उद्योग क्षेत्रांपैकी एक असलेल्या या औद्योगिक नगरीत सतत होणारे लहान-मोठे अपघात, रासायनिक वायुगळती, कंपनीतील आग व स्फोटांच्या घटना, सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे येथील औद्योगिक क्षेत्रासह कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सर्वात जुनी वसाहत असलेल्या तारापूर एमआयडीसी क्षेत्रात विविध १,८००च्या जवळपास कारखाने दररोज धडधडत आहेत. अनेक कारखान्यांकडे आवश्यक अग्निशमन यंत्रणा, गॅस सेन्सर, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था पूर्ण क्षमतेनुसार नाही. काही रासायनिक कारखान्यांत कामगारांना सुरक्षा प्रशिक्षण मिळत नसल्याचे समोर आले आहे. कंपन्यांमध्ये सुरक्षा ऑडिट वेळेवर न होणे आणि नियमांचे वरवर पालन करण्याचे प्रकार घडत असल्याने अपघात दुर्घटना वायुगळती रासायनिक गळती, आगी लागणे, स्फोट होण्याचे प्रकार घडत आहेत.
कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काही कंपन्यांत कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण असून कंपन्यांमध्ये कमी मनुष्यबळ, जुनाट यंत्रणा वापरली जात असल्याचे सांगितले जात आहे. कंपन्यांमध्ये रात्रपाळीच्या उत्पादन करणाऱ्या काही कारखान्यांमध्ये आवश्यक सुरक्षा अधिकारी उपलब्ध नसतात.
यंत्रणा अपुरी
तारापूर एमआयडीसीमध्ये कारखान्यात नियमितपणे लागणाऱ्या आगींना तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाकडे आवश्यक पुरेशी यंत्रणा मनुष्यबळ नसल्याने दलावर प्रचंड ताण आहे. नैसर्गिक गॅस, सॉल्व्हेंट, ज्वलनशील पदार्थांनी भरलेल्या उत्पादन कारखान्यात आग लागल्यास ती नियंत्रणात आणणे कठीण होते. अग्निशमन यंत्रणेकडे आधुनिक उपकरणांची कमतरता, अपुरा मनुष्यबळ आणि प्रशिक्षित जवानांची पुरेशी व्यवस्था नाही.
कारखान्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष
औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे लक्ष नसल्याने कारखानदारांना मोकळे रान मिळत आहे. काही पावले प्रशासन उचलत असली ती अपुरी आहेत. लाल आणि ऑरेंज श्रेणीतील कारखान्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. सुरक्षा परीक्षणाची आवश्यकता आहे. नियम न पाळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई अपेक्षित आहे. आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली मजबूत करणे आवश्यक बनले आहे.
काय आवश्यक?
- रासायनिक उत्पादन कारखाने क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मानकांची सुरक्षा प्रणाली
- तांत्रिक यंत्रणा, ऑटोमेशन, एआयआधारित एआय सेन्सर्स प्रणाली, ऑनलाइन मॉनिटरिंग किंवा देखरेख यंत्रणा
- अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण, अत्याधुनिक व प्रभावी उपकरणे आणि यंत्रणा
- कारखान्यांनी औद्योगिक सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक
आवश्यक नियमावली आणि नियम पाळण्याच्या दृष्टीने विभाग प्रयत्नशील आहे. कारखाना आणि कामगार सुरक्षेच्या कार्यशाळा, प्रात्यक्षिके अशी निरंतर प्रक्रिया सुरूच आहे. अपघात आणि घटना कमी व्हाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजना केली जात आहे.
- माधव तोटेवाड, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पालघर
मागील पाच वर्षांतील दुर्घटनांची आकडेवारी
वर्ष घटना मृत्यू जखमी खटले
२०२१ १४ ९ १८ ११
२०२२ १५ १२ १५ १६
२०२३ २८ १० २३ २२
२०२४ २३ ८ १८ १९
२०२५ ११ ९ १६ ७
एकूण ९१ ४८ ९० ७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.