बदलापूर स्थानकात प्रवाशांचा प्रचंड रोष!
मध्य रेल्वेचा पुन्हा बोजवारा; स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाला घेराव
बदलापूर, ता. १ (बातमीदार) : पहाटे पाचच्या लोकलपासूनच मध्य रेल्वेच्या संचालनाचा पुन्हा बोजवारा उडताच बदलापूर-मुंबई मार्गावरील प्रवाशांची सकाळ अक्षरशः कोलमडली. पहाटेपासून दुपारपर्यंत सर्व लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याने बदलापूर स्थानकात चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली. कर्जतमार्गे येणाऱ्या पहाटेच्या लोकल वारंवार उशिराने येऊ लागल्यावर त्रस्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाला थेट घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला. ‘दिवसाआड बिघाड, नेहमीचीच तांत्रिक अडचण’ हे रेल्वे प्रशासनाकडून मिळणारे तेच ते उत्तर न मिळाल्याने संताप आणखी भडकला.
बदलापूर शहरात पालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच यात नाहक त्रास सहन करणारे मतदार मात्र रोज सकाळी रेल्वेच्या गोंधळात अडकत आहेत. ‘उशिराचे फेरे आता पद्धतशीर झालेत,’ अशी तीव्र नाराजी प्रवाशांतून व्यक्त होत आहे. दररोज सकाळच्या पहिल्या लोकलपासून सुरू होणारा गोंधळ, त्या त्या दिवशीचा नवा बिघाड आणि प्रशासनाची शांत भूमिका या सगळ्यामुळे मध्य रेल्वेच्या अव्यवस्थेबद्दल प्रवाशांचा रोष शिगेला पोहोचला आहे. यातून सुटका देणारा पर्याय शोधत आहोत, असे प्रवाशांचे म्हणणे असून, आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही प्रवासी संघटनांकडून दिले जात आहेत.
-----
कसारा मार्गावरसुद्धा रेल्वेसेवा विस्कळित!
दरम्यान, बदलापूर मार्गावरील उशिरांच्या मालिकेत कसारा मार्गाने आणखी भर घातली. उंबरमाळी-खर्डीदरम्यान पोल क्रमांक १० येथे दुपारी एक ते दोनच्या वेळेत ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अप दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या दीड तास ठप्प झाल्या होत्या. परिणामी, दुपारी दोनची कसारा दिशेने जाणारी लोकल आसनगाव येथेच रद्द करण्यात आली. या दुहेरी तांत्रिक बिघाड आणि अव्यवस्थेमुळे पहाटेपासून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे वेळापत्रक विस्कळित झाले.
प्रतिक्रिया
मध्य रेल्वेवर लोकल उशिरा धावणे हे रोजचेच झाले आहे. आज बदलापूरमध्ये उशिराचा गोंधळ आणि त्यात कसारा मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हजारो प्रवाशांना भोगावी लागलेली गैरसोय पाहता प्रवासी संतप्त होणे स्वाभाविक आहे. या सर्व परिस्थितीस रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. भविष्यात प्रवाशांकडून उग्र आंदोलन उभे राहिले, तर त्याची पूर्ण जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाने घ्यावी.
- राजेश घणगाव, अध्यक्ष, कल्याण-कर्जत व कसारा रेल्वे प्रवासी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.